नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवच्या खेळीचे कौतुक केले आहे. आगामी टी-20 विश्वचषकासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये सूर्यकुमारच्या 360 डिग्री शॉट्ससाठी ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवरचा वेग आणि उसळी चांगली काम करेल, असे स्टेनने म्हटले आहे. सूर्यकुमार यादवने अलीकडेच झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या विश्वचषकात सूर्याच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असेल.
दरम्यान, सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर सोमवारी झालेल्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात 35 चेंडूत 52 धावा केल्या होत्या. खरं तर टी-20 विश्वचषकाची तयारी आणखी मजबूत करण्यासाठी, भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे संघ नुकतेच आमनेसामने आले होते. जिथे भारतीय संघाने यजमान संघाला 13 धावांनी पराभूत केले.
सूर्या मला एबी डिव्हिलियर्स आठवण करून देतो - स्टेन
दरम्यान, डेल स्टेनने स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह शोमध्ये सांगितले की, "सूर्या असा खेळाडू आहे ज्याच्यामध्ये गोलंदाजाची गती वापरण्याची क्षमता आहे. पर्थ, मेलबर्न यांसारख्या ठिकाणी खेळपट्टीवर काही अतिरिक्त उसळी आहे ज्याचा तो फायदा घेऊ शकतो. तो मागच्या पायाचा योग्य वापर करून शॉट्स मारू शकतो. सूर्याने काही अप्रतिम बॅक-फूट आणि फ्रंट-फूट कव्हर ड्राईव्ह खेळले आहेत."
सूर्यकुमार यादवचे कौतुक करताना स्टेनने म्हटले, "ऑस्ट्रेलियातील विकेट चांगली असून फलंदाजांसाठी उपयुक्त आहेत. इथे तुम्ही चेंडूच्या गतीचा वापर करू शकता. तो एक अप्रतिम 360 डिग्री खेळाडू आहे जो मला एबी डिव्हिलियर्सची आठवण करून देतो. तो एबी डिव्हिलियर्सची भारतीय आवृत्ती असू शकतो आणि तो सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता तो या विश्वचषकात नक्कीच सर्वात प्रभावी ठरेल. मी आगामी विश्वचषकात त्याची फलंदाजी पाहणार आहे," असे डेल स्टेनने म्हटले.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
13 नोव्हेंबरला अंतिम सामना
Web Title: Former South African bowler Dale Steyn said that Suryakumar Yadav is India's AB de Villiers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.