Jacques Kallis become father । नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक कॅलिसच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. ४७ वर्षीय माजी खेळाडू दुसऱ्यांदा बाबा झाला असून त्याला मुलगी झाली आहे. कॅलिसची पत्नी चार्लिनने बुधवारी एका मुलीला जन्म दिला. कॅलिसला एक मुलगा असून तो २०२० मध्ये पहिल्यांदा बाबा झाला होता.
खुद्द कॅलिसने याबाबतचे फोटो शेअर केले असून चाहत्यांना खुशखबर दिली आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये चिमुकलीसह तिची आई देखील दिसत आहे. कॅलिसने पोस्टमध्ये लिहले, "आम्ही तुमची आमच्या सुंदर मुलीशी क्लोई ग्रेस कॅलिससोबत भेट करून देत आहोत, जिचा जन्म आज सकाळी झाला. आई आणि मुलगी दोघीही ठिक आहेत. जॉशी देखील आपल्या बहिणीला भेटून खूप खुश आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार."
जॅक कॅलिसच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारात मिळून एकूण २५,३६० धावा केल्या आहेत. तो जगातील एकमेव खेळाडू आहे, ज्याने कसोटी आणि वन डे मध्ये १०,००० हून अधिक धावा केल्या आहेत आणि २५० बळी घेतले आहेत. कॅलिसने आयपीएलमध्ये देखील शानदार कामगिरी केली आहे. त्याने २०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. नंतर त्याने संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"