नवी दिल्ली: ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने २०२४ हे वर्ष क्रिकेट विश्वासाठी महत्त्वाचे असणार आहे. जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ही स्पर्धा होणार आहे. यासाठी जगभरातील संघ ट्वेंटी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करत आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात देखील क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटची मालिका खेळवली जात आहे. तर, पाकिस्तानी संघ ट्वेंटी-२० मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. खरं तर अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेतून भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले आहे.
दरम्यान, तब्बल १४ महिन्यांनी भारतीय दिग्गज ट्वेंटी-२० खेळत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. बीसीसीआयच्या या निर्णयाचे स्वागत करत जाणकारांनी रोहित शर्माच विश्वचषकात भारताचा कर्णधार असेल यावर शिक्कामोर्तब केला. अशातच दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने एक मोठे विधान केले. ट्वेंटी-२० विश्वचषक खेळण्यापूर्वी भारत केवळ तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेतून टीम इंडिया विश्वचषकाची तयारी करत आहे.
वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना डिव्हिलियर्सने म्हटले, "विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी मी खूप खुश आहे. प्रत्येकाला वाटते की, आपल्या सर्वोत्तम संघाने विश्वचषक जिंकावा. मी देखील माझ्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असाच विचार करायचो. माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात मी अशाच स्थितीत होतो पण माझ्या मनासारखे झाले नाही. परंतु मला वाटते की ही एक योग्य चाल आहे. रोहित आणि विराट हे अनुभवी खेळाडू असून त्यांनी विश्वचषक जिंकावा अशी चाहत्यांची इच्छा आहे."
ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली. तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.