नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सची गणना जगभरातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या डिव्हिलियर्सने अनेक विक्रम नोंदवले आहेत. मिस्टर ३६० म्हणून प्रसिद्ध असलेला डिव्हिलियर्स खेळपट्टीवर असतो तेव्हा भल्या भल्या गोलंदाजांना घाम फुटतो. पण, सगळ्या गोलंदाजांना ज्याची धास्ती असायची त्या डिव्हिलियर्सला कोणत्या गोलंदाजाची धास्ती असायची असे विचारला असता, माजी खेळाडूने तीन गोलंदाजांची नावे सांगितली आहेत. यामध्ये एका भारतीय गोलंदाजाचा समावेश आहे.
डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन पाच वर्ष झाली आहेत. खरं तर भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्याशी संवाद साधताना, डिव्हिलियर्सने खुलासा केला की, ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न, अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या गोलंदाजांचा सामना करताना अडचणी यायच्या.
वॉर्नचे केले कौतुक दिवंगत शेन वॉर्नच्या फिरकीबद्दल डिव्हिलियर्सने म्हटले, "वॉर्नमध्ये फलंदाजांच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याची क्षमता होती. वॉर्नच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे सर्वच फलंदाजांना त्याचा सामना करणे कठीण होते. समोर खेळपट्टी कशीही असो याचा वॉर्नच्या गोलंदाजीवर काहीही परिणा व्हायचा नाही. वॉर्नने त्याच्या कारकिर्दीत मला ६ डावांमध्ये चार वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे." तसेच राशिद खानची फिरकी गोलंदाजी देखील अप्रतिम असून तो फलंदाजांची डोकेदुखी वाढवू शकतो, असेही डिव्हिलियर्सने म्हटले.
बुमराहला खेळणे म्हणजे मोठे आव्हान - डिव्हिलियर्स मिस्टर ३६० ने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहचे कौतुक केले. "बुमराह नेहमीच खूप आव्हानात्मक राहिला आहे कारण त्याने अनेकांना स्वस्तात बाद केले. त्यामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल आणि तो ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतो त्याबद्दल खूप आदर आहे. अनेक वेळा मी त्याच्या गोलंदाजीवर सावध खेळी करण्याचा प्रयत्न केला पण तो परत आला आणि त्याने मला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मला त्याची हीच गोष्ट आवडते", असे डिव्हिलियर्सने आणखी सांगितले.