IPL 2024 RCB : दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने ( AB de Villiers) त्याचा माजी RCB सहकारी विराट कोहलीला ( Virat Kohli) मधल्या षटकांमध्ये अँकरची भूमिका बजावण्याचा सल्ला दिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ इंडियन प्रीमियर लीगच्या चालू आवृत्तीत ४ पैकी १ सामना जिंकू शकला आहे, परंतु ते पुनरागमन करतील असा विश्वास एबीला आहे.
एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर RCBच्या संघर्षावर भाष्य केले. विशेषत: मधल्या षटकांमध्ये विराटच्या फलंदाजीचे महत्त्व त्याने अधोरेखित केले. विराट कोहली १५ षटकांपर्यंत खेळपट्टीवर उभा राहावा आणि यामुळे बंगळुरूच्या फलंदाजांना मुक्तपणे खेळण्याची मुभा मिळेल, असे तो म्हणाला. एबीने आरसीबीचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसला पॉवरप्लेमध्ये अधिक जोखीम घेण्यास सांगितले.
"आशा आहे की, विराट कोहली त्याचा चांगला खेळ कायम राखेल. आरसीबीला मधल्या षटकांमध्ये त्याची गरज आहे. त्याला पहिल्या सहा षटकांत संयमाने खेळ करून शेवटपर्यंत खेळताना मला पाहायचे आहे. सहा षटकानंतर त्याने जोखीम घ्यायला हवी. त्यानंतर ६ ते १५ षटकापर्यंत त्याने टीकून खोऱ्याने धावा कराव्या, अशी माझी इच्छा आहे. त्याचे मैदानावर उभे राहणे, हे अन्य फलंदाजांसाठी महत्त्वाचे आहे आणि ते मोठे फटकेबाजी करून संघाला मोठी धावसंख्या उभी करून देऊ शकतील. त्याकडे लक्ष द्या," असे एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले.
आरसीबीच्या माजी फलंदाजाने या हंगामात संघाच्या संमिश्र कामगिरीचे विश्लेषण केले. तो म्हणाला की, ''संघाला स्पर्धेत कमबॅक करण्यासाठी दोन विजयांची आवश्यकता आहे आणि संघाला त्यांच्या घरच्या मैदानाबाहेर विजय मिळू शकेल. आरसीबीची सुरुवात वाईट नाही, पण चांगलीही नाही. त्यांना दोन विजयांची गरज आहे. ते घरच्या मैदानावर खेळण्यासाठी परतण्यापूर्वी प्रतिस्पर्धींच्या मैदानावर विजय मिळवतील, अशी आशा आहे."
एबी डिव्हिलियर्स हा आरसीबी फ्रँचायझीच्या प्रमुख सदस्यांपैकी एक होता. त्याने २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता कॅपिटल्स) कडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. डिव्हिलियर्स २०११ मध्ये आरसीबीमध्ये गेला आणि २०२१ पर्यंत तो त्यांच्यासाठी खेळला. त्याने आरसीबीसाठी १५६ सामन्यांत ४१.२० च्या सरासरीने ४४९१ धावा केल्या. RCBने त्याचे नाव ख्रिस गेलसह 'हॉल ऑफ फेम' मध्ये समाविष्ट केले आहे.