श्रीलंकेचा आणि कोलकाता नाइट रायडर्सचा माजी क्रिकेटपटू सचित्र सेनानायके ( Sachithra Senanayake) याला बुधवारी मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्याला क्रीडा भ्रष्टाचार तपास पथकाने अटक केली. ३ आठवड्यांपूर्वी न्यायालयाने त्याच्यावर परदेशात जाण्यास बंदी घातली होती. सेनानायकेवर लंका प्रीमियर लीग २०२० मधील सामने फिक्स केल्याचा आणि २ खेळाडूंना सामना फिक्स करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ३८ वर्षीय सेनानायकेने श्रीलंकेसाठी १ कसोटी, ४९ वन डे आणि २४ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या ऑफस्पिनरने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर २०१६ मध्ये खेळला होता. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
यापूर्वी कोलंबो न्यायालयाने सचित्र सेनानायके यांच्यावर ३ महिन्यांसाठी प्रवास बंदी घातली होती. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, न्यायालयाला आज सांगण्यात आले की क्रीडा मंत्रालयाच्या विशेष तपास युनिटने अॅटर्नी जनरल विभागाला माजी ऑफस्पिनरविरुद्ध फौजदारी आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये सेनानायकेवरही संशयास्पद गोलंदाजीमुळे बंदी घालण्यात आली होती. नंतर त्याने आपली गोलंदाजी सुधारली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.