नवी दिल्ली : ५ ऑक्टोबरपासून भारतात आयसीसी वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात असले तरी श्रीलंकेचा माजी खेळाडू अन् १९९६ चा विश्वचषक विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगाने एक मोठे विधान केले आहे. इतर संघांच्या तुलनेत भारतीय संघात प्रभावी फिरकीपटू नसल्याचे त्याने नमूद केले. तसेच रवीचंद्रन अश्विन हा पर्याय असताना देखील त्याला वगळण्यात आले असल्याचेही त्याने सांगितले.
आयसीसीच्या या स्पर्धेबद्दल बोलताना विश्वविजेत्या कर्णधाराने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पीटीआय या वृत्तवाहिनीशी बोलताना अर्जुन रणतुंगाने म्हटले, "आयसीसी हा दात नसलेला वाघ आहे. त्यातील अधिकारी आणि इतर वर्गातील कर्मचारी अतिशय अव्यावसायिकपणे वागतात. मला वाटते की त्यांनीच क्रिकेटचे संरक्षण करायला हवे."
विश्वचषकातील भारतीय संघाबद्दल बोलताना त्याने सांगितले की, विश्वचषक जिंकण्यासाठी तुम्हाला दोन चांगल्या फिरकीपटूंची गरज आहे. खरं सांगायचे तर, भारताकडे योग्य फिरकीपटू आहेत की नाही हे मला माहीत नाही. टीम इंडियात चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत पण योग्य फिरकीपटू मला दिसत नाहीत. पाकिस्तान, इंग्लंड यांसारख्या संघात योग्य फिरकीपटू आहेत. भारताकडे रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल आहे पण त्यांनी रवीचंद्रन अश्विनसारख्या एकाला खेळवायला हवे असे मला वाटते. बळी घेऊन देईल अशा फिरकीपटूची गरज आहे.
दरम्यान, १९९६ मध्ये अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वात श्रीलंकेने विश्वचषक उंचावला होता. क्रिकेटला रामराम केल्यानंतर त्याने श्रीलंकेच्या क्रिकेट प्रशासनातील अनेक पदे सांभाळली. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्याने २००५ मध्ये राजकीय खेळीला सुरूवात केली आणि आता ते परिवहन आणि नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत. सध्या श्रीलंकेत आशिया चषकाचा थरार रंगला असून रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात किताबासाठी लढत होणार आहे.
आशिया चषक उंचावणारे संघ अन् कर्णधार
- १९८४ - भारत - सुनिल गावस्कर
- १९८६ - श्रीलंका - दलीप मेंडीस
- १९८८ - श्रीलंका - दलीप मेंडीस
- १९९०-९१ - भारत - मोहम्मद अझहरुद्दीन
- १९९५ - भारत - मोहम्मद अझरुद्दीन
- १९९७ - श्रीलंका - अर्जुन रणतुंगा
- २००० - पाकिस्तान - मोईन खान
- २००४ - श्रीलंका - मार्वन अटापट्टू
- २००८ - श्रीलंका - महेला जयवर्धने
- २०१० - भारत - महेंद्रसिंग धोनी
- २०१२ - पाकिस्तान - मिस्बाह-उल-हक
- २०१४ - श्रीलंका - अँजेलो मॅथ्यूज
- २०१६ - भारत - महेंद्रसिंग धोनी
- २०१८ - भारत - रोहित शर्मा
- २०२२ - श्रीलंका - दासुन शनाका