Join us

धक्कादायक! श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची कुटुंबीयांसमोर गोळ्या झाडून हत्या

श्रीलंकेच्या अंडर-१९ संघाचा माजी कर्णधार धम्मिका निरोशनाची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 12:13 IST

Open in App

Dhammika Niroshana shot dead : भारतीय संघ येत्या २७ तारखेपासून श्रीलंकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात वन डे मालिका खेळवली जाईल. या मालिकेला सुरुवात होण्याआधीच श्रीलंकेत एक धक्कादायक घटना घडली. श्रीलंकेच्या अंडर-१९ संघाचा माजी कर्णधार धम्मिका निरोशनाची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. ४१ वर्षीय निरोशनाची अंबालांगोडा येथील कांडा मावाथा येथील त्याच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली.

या धक्कादायक घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी सांगितले की, हत्या झाली तेव्हा निरोशना त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत होता. तितक्यात हल्लेखोराने त्याच्यावर बंदुकीने गोळ्या झाडल्या. पोलिसांनी अद्याप संशयित आणि गोळीबारामागील हेतू ओळखला नाही, परंतु तपास सुरू आहे. डावखुरा खेळाडू निरोशना अष्टपैलू कामगिरी करण्यात माहिर होता. त्याने २००० मध्ये श्रीलंकेच्या १९ वर्षाखालील संघात पदार्पण केले. त्याने २००२ मध्ये न्यूझीलंडच्या धरतीवर झालेल्या अंडर-१९ विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाचे कर्णधारपद सांभाळले. तेव्हा पाच सामन्यांमध्ये सात बळी घेण्यात निरोशनाला यश आले. १२ प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या निरोशनाने २०० हून अधिक धावा आणि १९ बळी घेतले आहेत. 

दरम्यान, २७ जुलैपासून श्रीलंका आणि भारत यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळेल. मात्र, यासाठी अद्याप बीसीसीआयने आपला संघ जाहीर केला नाही. श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून वरिष्ठ खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते. 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाश्रीलंकामृत्यूऑफ द फिल्ड