ऑक्टोबर-नोव्हेंबर हे दोन महिने क्रिकेट विश्वासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण ५ ऑक्टोबरपासून भारतीय संघ एका नव्या अध्यायाचा सामना करणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. त्यामुळे आगामी स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून टीम इंडियाकडे पाहिले जात आहे. या स्पर्धेसाठी रोहितसेनेची घोषणा झाली असून १५ शिलेदारांच्या खांद्यावर तमाम भारतीयाचे स्वप्न असणार आहे. या बहुचर्चित स्पर्धेपूर्वी क्रिकेट जगतातील जाणकारांसह माजी खेळाडू आपापली मतं मांडत आहेत. अशातच श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराने एक भाकीत वर्तवले आहे.
संगकाराच्या मते यजमान भारतीय संघ आणि गतविजेता इंग्लंडचा संघ आगामी स्पर्धेचा प्रबळ दावेदार असेल. मात्र, अलीकडेच श्रीलंकेची कामगिरी प्रभावी ठरत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही संगकाराने सांगितले. इंग्लंडने शुक्रवारी न्यूझीलंडचा १०० धावांनी पराभव करत चार सामन्यांची वन डे मालिका ३-१ ने आपल्या नावावर केली. चौथ्या वन डे सामन्यानंतरच्या सामन्यानंतर संगकाराने न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सायमन डोल आणि इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन यांच्याशी विश्वचषकातील स्पर्धकांविषयी चर्चा केली. "मला वाटते की भारत आणि इंग्लंड सर्वात मोठे दावेदार असतील. मी श्रीलंकेच्या संघाचा शेवटचा सामना पाहिला आणि त्यांनी संपूर्ण आशिया चषक स्पर्धेत ज्या प्रकारे कामगिरी केली, ते पाहता प्लेऑफसाठीही ते आव्हानात्मक ठरू शकतात. एकदा तुम्ही प्लेऑफमध्ये पोहोचला की, फक्त एक सामना दूर असता. जर संघासाठी दिवस चांगला असेल तर तुम्ही फायनलमध्ये देखील पोहोचू शकता", असेही संगकाराने सांगितले.
तसेच मी सायमनला ओळखतो, त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाची निवड केली आहे. पण, आगामी विश्वचषकात बरेच दावेदार आहेत. नाही का? जवळपास सात-आठ संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मी इतर संघांच्या तुलनेत इंग्लंड आणि भारताला प्रबळ दावेदार मानतो, असेही संगकाराने नमूद केले.
वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू