IND vs NZ ODI Series:भारत आणि न्यूझीलँड या दोन संघात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलँडवर १२ धावांनी विजय मिळवला. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना २१ जानेवारीला रायपूर येथे खेळला जाणार आहे. आताच्या घडीला विराट कोहली फॉर्ममध्ये असून, अफलातून खेळी करताना दिसत आहे. मात्र, यातच भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे. हा सल्ला देताना मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे उदाहरण केले आहे.
विराटने मालिकेतील शेवटची वनडे म्हणजेच तिसरी वनडे खेळण्याऐवजी रणजी ट्रॉफी सामना खेळावा. जेणेकरून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी आत्मविश्वास वाढू शकेल, असा अजब सल्ला रवी शास्त्री यांनी दिला आहे. २५ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर सीसीआयमध्ये ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळायला गेला आणि त्याने द्विशतक झळकावले. दोन महिन्यांनंतर १९९८ मध्ये सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्व फॉरमॅटमध्ये एक हजारच्या वर धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला माहिती होते की, तो या खेळाडूला लवकर बाद करू शकणार नाही, अशी एक आठवण रवी शास्त्री यांनी सांगितली.
अधिकाधिक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले पाहिजे
मी नेहमी म्हणतो की, खेळाडूंनी अधिकाधिक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले पाहिजे. विशेषत: जेव्हा भारतात जास्त क्रिकेट खेळायचे असेल, तेव्हा प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळणे उपयुक्त ठरू शकते. टॉपचे खेळाडू पुरेसे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत नाहीत. भारतात भरपूर क्रिकेट आहे. मात्र, जोखीम पत्करायला तयार होत नाही. काहीवेळा तुम्हाला चतुराईने वागावे लागते. आणि मोठी खेळी साकारण्यासाठी काही सामन्यांचा त्याग करावा लागतो, असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. तसेच विराट कोहलीने न्यूझीलँडविरुद्ध तिसरा वनडे खेळू नये आणि बॉर्डर गावस्कर मालिकेच्या तयारीसाठी रणजी सामना खेळायला, असे माझे स्पष्ट मत आहे, असे रवी शास्त्री यांनी सांगितले.
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना २४ जानेवारीला होणार आहे. एकदिवसीय सामन्यातील विराटचा फॉर्म परत आला आहे. मात्र, विराट कोहलीचे शेवटचे कसोटी शतक २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध झाले होते. विराट कोहली बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळला होता. मात्र, या कसोटी मालिकेत विराट कोहलीला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: former team india coach ravi shastri said virat kohli should play first class cricket not india vs new zealand series 3rd odi match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.