Join us  

...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा

गौतम गंभीर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा मार्गदर्शक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 1:10 PM

Open in App

Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा मार्गदर्शक आहे. गंभीरची केकेआरच्या ताफ्यात एन्ट्री झाल्यापासून संघात अनेक बदल पाहायला मिळाले. सुनील नरेनला सलामीवीर म्हणून खेळवण्याची रणनीती चांगलीच फायदेशीर ठरली. गंभीरच्या नेतृत्वात केकेआरच्या संघाने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएलचा किताब जिंकला आहे. तसेच तो २००७ आणि २०११ मध्ये भारताच्या विश्वविजेत्या संघाचा हिस्सा राहिला आहे. २०११ मध्ये झालेल्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गंभीरने महत्त्वाची खेळी केली होती. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्यानंतर आयपीएल गाजवणाऱ्या गंभीरने त्याच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या दिवसांबद्दल भाष्य करताना एक मोठा खुलासा केला आहे. रवीचंद्रन अश्विनसोबतच्या चॅट शोमध्ये बोलताना गंभीरने त्याचा संघर्ष सांगितला. गंभीरने वयोगटातील स्पर्धांमध्ये आपल्याशी भेदभाव कसा केला गेला हे उघड केले. "मी १२-१३ वर्षांचा असताना प्रथमच अंडर-१४ स्पर्धेसाठी प्रयत्न केला. तेव्हा निवडकर्त्यांच्या पायाला स्पर्श न केल्यामुळे माझी निवड झाली नाही... अर्थात मी त्यांच्या पाया न पडल्यामुळे मला संघात स्थान मिळाले नाही. तेव्हापासूनच मी ठरवले की, आता आपण कधीच कोणाच्या पाया पडायचे नाही आणि मी कधीच कोणाला माझ्या पाया पडू देत नाही. 

गंभीरचा मोठा खुलासागौतम गंभीरने आणखी सांगितले की, जेव्हा जेव्हा मला अपयश आले तेव्हा तेव्हा माझे कुटुंबीय नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले. मला आजही आठवते मी अंडर-१६, अंडर-१९, रणजी करंडक खेळत असताना अनेकांनी मला सल्ला दिला की, तुझ्या घरात सर्वकाही चांगले असताना तुला क्रिकेट खेळायची काय गरज आहे. तुझ्याकडे एवढे पर्याय असताना तू क्रिकेटकडे वळतो आहेस हे चुकीचे आहे. वडिलांचा व्यवसाय आहे त्यात लक्ष घालू शकतोस. पण, मला लोकांच्या याच विचाराला प्रत्युत्तर द्यायचे होते. 

अश्विनसोबतच्या या शोमध्ये गंभीरने केकेआरच्या संघाचा मालक शाहरूख खानचे तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला की, मी यापूर्वी देखील सांगितले आहे, शाहरूख खानसारखा चांगला संघ मालक असू शकत नाही. ज्यांच्यासोबत मी काम केले आहे त्यांच्यात शाहरूख सर्वोत्कृष्ट आहे. मी केकेआरमध्ये परतलो आहे म्हणून हे बोलत नाही तर याची खूप कारणे आहेत. मी ७ वर्ष कर्णधार असताना शाहरूख आणि माझ्यात ७० सेकंद देखील क्रिकेटबद्दल चर्चा झाली नाही. याची तुम्ही कल्पना करू शकता का?

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघकोलकाता नाईट रायडर्सऑफ द फिल्ड