harbhajan singh angry : पाकिस्तानचे चाहते त्यांच्या संघातील खेळाडूंप्रमाणे कधी काय करतील याची कल्पना नसते. एखाद्या संघाने पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवल्यानंतर पाकिस्तानी चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत असतात. या प्रतिक्रिया म्हणजे जणू काही कॉमेडी शो असतो. आता पाकिस्तानातील एका क्रीडा पत्रकाराने हद्दच ओलांडली. त्याने चक्क यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानची तुलना भारतीय संघाचा माजी कर्णधार, दिग्गज, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीसोबत केली. ही पोस्ट पाहताच भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने संतप्त प्रतिक्रिया दिली.
पाकिस्तानच्या पत्रकाराने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळावी या हेतूने हे कृत्य केल्याचे दिसते. कारण तो वारंवार काहीही पोस्ट करून भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधत असतो. खरे तर त्याच्यावर कितीही टीका झाली तरी तो त्याचा हेतू साध्य करण्यात यशस्वी होतो. कारण भारतीय चाहते अथवा एखाद्या माजी खेळाडूने यावर प्रतिक्रिया दिल्यास त्याला प्रसिद्धी मिळून जाते. पण, आता त्याने केलेल्या या पोस्टने भज्जीची मात्र चांगलीच सटकली.
हरभजनची संतप्त प्रतिक्रिया
पाकिस्तानातील पत्रकाराच्या पोस्टवर व्यक्त होताना हरभजनने म्हटले की, हल्ली तू कोणती नशा करतोस??? हा किती मूर्खपणाचा प्रश्न आहे. मित्रांनो याला सांगा. धोनी रिझवानपेक्षा खूप पुढे आहे आणि जर तुम्ही रिझवानला हा प्रश्न विचाराल तर तो देखील तुम्हाला चोख उत्तर देईल. मला रिझवान आवडतो, तो खूप चांगला खेळाडू आहे आणि नेहमी संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळतो, पण ही तुलना पूर्णपणे चुकीची आहे. आजच्या युगातही धोनी अव्वल क्रमांकावर आहे. यष्टिरक्षणाच्या बाबतीत धोनीपेक्षा सरस कोणीच नाही.
दरम्यान, धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने तीनवेळा आयसीसीचा किताब जिंकला आहे. धोनी कर्णधार असताना भारताला एक ट्वेंटी-२० विश्वचषक, एक वन डे विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश आले. २०१३ मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात आयसीसीचा किताब जिंकला होता. तेव्हापासून मोठ्या कालावधीपर्यंत टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीच्या प्रतिक्षेत होती. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकून तमाम भारतीयांची इच्छा पूर्ण केली.
Web Title: Former Team India Player Harbhajan Singh Furious After Pakistani Journalist Compares Mohammad Rizwan And MS Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.