ipl retention rules 2025 : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयने काही मोठे निर्णय घेतले आहेत. आयपीएल स्पर्धेसाठी आता काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. आयपीएलसाठी आयसीसीनेही एक स्पेशल विंडो दिली आहे. त्यामुळे ही स्पर्धा जगात भारी ठरते. पाकिस्तानचे खेळाडू सोडले तर जवळपास सर्वच देशातील खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून मालामाल होण्याची संधी असते. नव्या नियमात खेळाडूंना सामना फी (Match Fees) देण्याची तरतूद करत बीसीसीआयने या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंचा मोबदला आणखी वाढवला आहे. पण, या फायद्याच्या नियमासोबत आणखी एक नियम आहे जो या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूला अगदी गोत्यात आणणारा आहे. हा नियम मोडणाऱ्या खेळाडूला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. नवीन नियमानुसार लिलावात निवड झाल्यानंतर कोणताच खेळाडू अनुपलब्ध राहू शकत नाही.
खरे तर आयपीएलच्या लिलावात मोठी बोली लागल्यानंतर अनेकदा असे पाहायला मिळाले आहे की, खेळाडू कोणत्या ना कोणत्या कारणावरून स्पर्धेतून माघार घेतात. ज्याचा मोठा फटका फ्रँचायझीला बसतो. पण बीसीसीआयने आता नव्या नियमाच्या माध्यमातून खेळाडूंना वेसण घालण्याचा प्रयत्न केला आहे. आयपीएलच्या नव्या नियमावलीत (IPL Player Regulations 2025-27) यासंदर्भात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या नियमाचे स्वागत करताना माजी खेळाडू इरफान पठाणने बीसीसीआयचे आभार मानले आहे. दरम्यान, आता आयपीएलमधून माघार घेतली तर अशा खेळाडूच्या विरोधात कठोर पाऊल उचलले जाणार आहे. आयपीएलमधून माघार घेणाऱ्या खेळाडूवर पुढच्या दोन हंगामासाठी बंदी घालण्यात येईल, असा उल्लेख आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नवीन नियमावलीत करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या नवीन नियमावलीनुसार, स्पर्धेतून माघार घेणाऱ्या खेळाडूला दोन वर्षांच्या बंदीचा सामना करावा लागणार हे स्पष्ट आहे. पण कोणत्या परिस्थितीत ही कारवाई होणार हे स्पष्ट नाही. पण या नियमाचा उद्देश मनमानी करणाऱ्या खेळाडूंना आवर घालणे हाच दिसतो.
इरफान पठाणने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, मी गेली दोन वर्षे यावर बोलत आलो आहे. बीसीसीआयने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय पाहून खूप आनंद झाला. लिलावात निवड झाल्यानंतर अनुपलब्धता घोषित करणाऱ्या खेळाडूंना आता दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागेल. यामुळे आयपीएल अनेक प्रकारे मजबूत होईल.