बीसीसीआय सचिव जय शाह हे आयसीसीचे अध्यक्ष होताच आजी माजी खेळाडू त्यांना शुभेच्छा देत आहेत. ३५ वर्षीय शाह हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. बीसीसीआय सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. १ डिसेंबर २०२४ पासून ते आपल्या या नवीन पदाचा कारभार सांभाळतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाल्याने शाह यांच्या पदासह जबाबदारीतही मोठी वाढ झाली आहे. (Jay Shah, ICC Chairman Salary) बीसीसीआयमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा पगार निश्चित नसतो. त्यांना भत्ता पुरवला जातो. जय शाह हे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे बॉस असतील.
भारतीय क्रिकेटचा चेहरा म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर... सचिनने जय शाह यांचे कौतुक करताना त्यांच्या ऐतिहासिक निर्णयाचा दाखला दिला. जय शाह हे एक उत्साही आणि क्रिकेटसाठी काहीतरी चांगले करण्याची इच्छा असणारे व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट प्रशासकासाठी आवश्यक असणारे गुण त्यांच्यात आहेत. म्हणूनच बीसीसीआय सचिव म्हणून त्यांनी काही मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. महिला क्रिकेटपटू आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मानधन देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि हा निर्णय घेतला. त्यामुळे मला वाटते की, इतरही क्रिकेट बोर्ड बीसीसीआयच्या या निर्णयाचे अनुसरण करू शकतात, असे सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले.
सचिन पुढे म्हणाला की, मी जय शाह यांना त्यांच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. ते सर्वात तरुण आयसीसी अध्यक्ष बनले आहेत. ICC चे नेतृत्व करण्यासाठी भारताने अनेक दिग्गजांना प्रशासक म्हणून पाठवले आहे. यामध्ये जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांचा समावेश आहे. मला खात्री आहे की ते या सर्वांचा वारसा पुढे नेतील आणि क्रिकेटचा खेळ पुढे जात राहील.