Saurabh Tiwary On MS Dhoni: आयपीएलचा सतरावा हंगाम सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. गतवर्षी चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्वात आयपीएलचा किताब जिंकला. आयपीएलच्या इतिहासातीलही सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीकडे पाहिले जाते. त्याच्या नेतृत्वात चेन्नईला पाचवेळा चॅम्पियन होता आले आहे.
दरम्यान, कॅप्टन कूल धोनीबद्दल भारताचा माजी खेळाडू सौरभ तिवारीने एक मोठे विधान केले आहे. धोनी हा झारखंड क्रिकेटचा देव असल्याचे त्याने सांगितले. क्रिकेटचा देव म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर तमाम भारतीयांनी भरभरून प्रेम केले. अशातच सौरभ तिवारीने झारखंड क्रिकेटचा देव अशी धोनीला उपमा दिली.
तिवारीकडून धोनीवर स्तुतीसुमनेसौरभ तिवारीने धोनीचे तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला की, धोनी झारखंड क्रिकेटसाठी देव आहे. जेव्हापासून माहीने भारतीय क्रिकेट संघासाठी खेळणे सुरू केले आहे, तेव्हापासून सर्वांनी आमच्याकडे एक टीम म्हणून पाहिले आहे. झारखंड नक्की कुठे आहे याची प्रचिती आम्हाला आली. धोनीने दिलेल्या आत्मविश्वासामुळे आम्ही कोणापेक्षा कमी नाही याची जाणीव झाली. जेव्हा कधी तो इथे येतो किंवा जवळच्या शहरात असतो. तेव्हा आवर्जुन सराव सत्रात सहभागी होत असतो. माही भाईचा पाठिंबा आमच्यासाठी मोलाची बाब आहे. सौरभ तिवारी 'टाइम्स नाउ' या वृत्तसंस्थेशी बोलत होता.
तसेच जेव्हा धोनी संघाचे नेतृत्व करतो, तेव्हा आम्हाला आमच्या खेळात खूप स्वातंत्र्य मिळते. आम्ही चांगली कामगिरी केली नाही तरी तो नेहमी पाठीशी उभा असतो. संघाचे नेतृत्व करण्याव्यतिरिक्त, धोनी जेव्हा जेव्हा आमच्यासोबत असतो तेव्हा खूप आत्मविश्वास वाढतो, असेही तिवारीने नमूद केले. धोनी आगामी आयपीएल हंगामात दिसणार आहे. आयपीएल २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. आयपीएल २०२४ ला २२ मार्चपासून सुरू होणार आहे आणि पहिल्या १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांनंतर पुढील वेळापत्रक जाहीर केले जाईल.