भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. १८ ऑगस्ट २०२४ रोजी किंग कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची १६ वर्षे पूर्ण केली. अलीकडेच विराटने ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या विजयानंतर ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले. विराट आता केवळ वन डे, कसोटी आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. आयपीएलमधील आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी संघाबद्दल बोलताना विराटने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे नाव घेणे टाळले. त्याने दुसऱ्याच संघाचे नाव घेऊन सर्वांचे लक्ष वेधले.
१८ ऑगस्ट २००८ साली विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यातून त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. विराटने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत विविध बाबींवर प्रकाश टाकला. यावेळी त्याने रॅपिड फायरमध्ये विविध प्रश्नांची उत्तरे देताना मुंबईला आपले घर असे संबोधले.
आवडता क्रिकेटर या प्रश्नावर विराटने महेंद्रसिंग धोनी आणि एबी डिव्हिलियर्स या दोघांच्या नावाला पसंती दिली. चिन्नस्वामी स्टेडियम आवडते असल्याचेही त्याने सांगितले. तसेच आयपीएलमधील आवडता प्रतिस्पर्धी संघ म्हणून त्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचे नाव घेतले. याशिवाय मुंबई शहराला किंग कोहलीने घर असे संबोधले. आवडता गायक अरिजीत सिंह तर आवडता सण म्हणून विराटने दिवाळी सणाला प्राधान्य दिले.
दरम्यान, विराट कोहली सध्या त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. १९ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत तो परतण्याची शक्यता आहे.
बांगलादेशचा भारत दौरा१९-२४ सप्टेंबर - पहिला कसोटी सामना, चेन्नई२७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर - दुसरा कसोटी सामना, कानपूर६ ऑक्टोबर - पहिला ट्वेंटी-२० सामना, ग्वाल्हेर९ ऑक्टोबर - दुसरा ट्वेंटी-२० सामना, दिल्ली १२ ऑक्टोबर - तिसरा ट्वेंटी-२० सामना, हैदराबाद