पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला खराब फॉर्ममुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले. या मालिकेतील पहिल्या सामन्यात तो संघाचा भाग होता. मात्र, पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्याच्यासह शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांना डच्चू मिळाला. संघाबाहेर असलेल्या बाबरला सल्ला देताना भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने देशांतर्गत क्रिकेटकडे वळण्यास सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलेले अपयश भरुन काढण्यासाठी अनेकांनी देशांतर्गत क्रिकेटची मदत घेतली असल्याचे सेहवागने नमूद केले.
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून पाहुण्या इंग्लंडने विजयी सलामी दिली. मग दुसऱ्या सामन्यातील विजयासह यजमान पाकिस्तानने १-१ अशी बरोबरी साधली. त्यामुळे मालिकेतील अखेरचा सामना निर्णायक असेल. दुसऱ्या सामन्यात बाबरच्या जागी संधी मिळालेल्या कामरान गुलामने शानदार शतकी खेळी करुन आपल्या संघाच्या विजयात मोठे योगदान दिले.
शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनलवर बोलताना सेहवागने सांगितले की, बाबर आझमने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी व्हायला हवे. तिथे चांगली कामगिरी केल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन करू शकतो. तसेच त्याने फिटनेसवर लक्ष केंद्रित करायला हवे. कुटुंबीयांसोबत वेळ घालवावा... मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असलेला खेळाडूच शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असतो हे वेगळे सांगायला नको.
तसेच बाबरला कर्णधारपदावरुन पायउतार व्हावे लागल्याने तो मानसिकदृष्ट्या खचला आहे. याचा परिणाम त्याच्या खेळीवर झाल्याचे दिसले. त्यामुळे मला वाटते की त्याने मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याची गरज आहे. तो एक अप्रतिम फलंदाज आहे यात शंका नाही आणि त्याच्यासारखे खेळाडू जोरदार पुनरागमन करतात हा इतिहास आहे, असेही वीरुने सांगितले. दरम्यान, कामरान गुलामची शतकी खेळी आणि साजिद खानने एकाच डावात घेतलेल्या सात बळींमुळे पाकिस्तानचा विजय सोपा झाला. शेजाऱ्यांनी दुसरा सामना १२५ धावांनी जिंकला आणि मालिकेत बरोबरी साधली. तिसरा अखेरचा अर्थात निर्णायक सामना रावळपिंडी येथे २४ ऑक्टोबरपासून खेळवला जाईल.