ओडिशात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघाताने सर्वांनाच हादरवून सोडलंय. भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक आहे. या अपघातात शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत या अपघातग्रस्तांना मदतीसाठी प्रत्येकजण आपल्या परीनं मदतीचा हात पुढे करत आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाच्या माजी सलामीवीरानंही अपघातग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतलाय. अपघातात आई-वडिलांचं छत्र गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च तो उचलणार असल्याची घोषणा सेहवागनं केली आहे. त्या मुलांना 'बोर्डिंग फॅसिलिटी ऑफ सेहवाग स्कूल' मध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय विरेंद्र सेहवागनं घेतलाय.
सेहवागनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातील माहिती दिली. त्यानं यासोबत रेल्वे अपघाताचा एक फोटोही शेअर केलाय. "दु:खाच्या या प्रसंगी अपघातात आपले गमावणाऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाची जबाबदारी घेण्याचं काम तर मी करूच शकतो. त्यांना मी सेहवाग स्कूलच्या बोर्डिग फॅसिलिटीमध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. सर्वच कुटुंबीयांप्रती संवेदना आणि बचाव कार्यात पुढे आलेल्या, मेडिकल टीम, रक्तदाते अशा सर्व धाडसी लोकांचंही कौतुक. आम्ही यात तुमच्या सोबत आहोत," असं ट्वीट विरेंद्र सेहवागनं केलंय.
अदानींचाही मदतीचा हातअदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनीदेखील एक मोठी घोषणा केली. अपघातात आई-वडील गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली.