उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील गाजीपूर रिंग रोड येथे गुरुवारी रात्री एक भिषण अपघात झाला. रिंग रोडवर एका गाडीचा ताबा सुटला आणि ती दोन गाड्यांवर धडकली. यापैकी एक गाडी भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा माजी उपकर्णधार अक्षदीप नाथ याची होती. अक्षदीपच्या फोर्ड मस्टँग या गाडीनेच अन्य गाडींना धडक दिल्याचे वृत्त आहे. अक्षदीपच्या गाडीची अवस्था पाहून ही टक्कर किती जोरदार असेल याची कल्पना येत आहे. पण, सुदैवानं या अपघाताता अक्षदीपसह कोणालाच काही झाले नाही. हे प्रकरण गाजीपूर पोलीस ठाण्यात गेले तेव्हा तीनही पक्षकारांनी आपापसात हे प्रकरण मिटवण्याचा निर्णय घेतला.
अक्षदीप स्वतः गाडी चावलत होता. मध्यरात्री अक्षदीप कुठेतरी जात होता आणि नियंत्रण सुटल्यामुळे त्याच्या गाडीने दोन गाडींना जोरदार धडक दिली. त्यानंतर त्याची गाडी डिव्हायडरवर आदळली आणि थांबली. लोकांच्या मदतीनं गाडीतील पाच जणांना बाहेर काढण्यात आले. त्यात अक्षदीपसह त्याच्या मित्रांचा समावेश होता.
अक्षदीप हा उत्तर प्रदेशचा खेळाडू आहे. 2012च्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा उप कर्णधार होता. रणजी करंडक स्पर्धेच्या 2017-18 मोसमात उत्तर प्रदेशकडून सर्वाधिक 387 धावा त्यानं केल्या होत्या. ऑगस्ट 2019मध्ये त्याचा दुलीप ट्रॉफीसाठी भारत ग्रीन संघात निवड झाली होती.
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याला गुजरात लायन्स ( 2017), किंग्स इलेव्हन पंजाब ( 2018) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( 2019) या संघांनी आपल्या ताफ्यात घेतले, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.