नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीनंतर कोण, तर रिषभ पंत, असे म्हटले जाते. त्यासाठीच पंतला भारतीय संघ भरपूर संधी देताना पाहायला मिळते. पण या संधीचा फायदा मात्र पंतला उचलाना येत नाहीए. त्यामुळेच पंतला डच्चू देऊन वृद्धिमान साहा संधी द्यावी, असे स्पष्ट मत माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांनी व्यक्त केले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्याने अनुक्रमे 24 आणि सात धावा केल्या. एकदिवसीय मालिकेतही त्याला चांगली फलंदाजी करता आली नव्हती. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यात पंतला संघात स्थान देऊन नये, असे किरमाणी यांना वाटते. हातात ग्लोव्हज घालून कुणी यष्टीरक्षक होत नाही, अशा शब्दांत किरमाणी यांनी पंतवर टीका केली आहे.
याबाबत किरमाणी म्हणाले की, " पंतची कामगिरी पाहिली तर ती चांगली झालेली नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात पंतला खेळवले नाही पाहिजे. त्याच्याजागी साहाला संधी द्यायला हवी. दुखापतीमुळे तो काही काळ संघाच्या बाहेर होता. पण आता तो फिट झाला आहे. त्यामुळे साहाला संधी देण्यात यावी, असे मला वाटते."