झिम्बाब्वेचे माजी कर्णधार ॲन्डी फ्लॉवर हे आयपीएल फ्रॅन्चायजी लखनौ संघाचे मुख्य कोच बनले आहेत. नवा संघ २०२२च्या आयपीएल सत्रात पदार्पण करेल. या संघाचे अद्याप नावदेखील ठरलेले नाही. फ्लॉवर हे आयपीएलच्या मागील दोन पर्वात पंजाब किंग्सचे सहायक कोच होते. मागच्या दोन पर्वात पंजाबचा कर्णधार असलेला लोकेश राहुल हा देखील संजीव गोयंका यांच्या मालकीच्या लखनौ संघासोबत जुळण्याची दाट शक्यता आहे.
एका वक्तव्यात फ्लॉवर म्हणाले,‘ मी नव्या लखनौ संघासोबत जुळल्याने उत्साहित आहे. संधी दिल्याबद्दल आभारही मानतो. १९९३ ला पहिल्यांदा भारत दौरा केल्यापासून सतत भारतात येणे, येथे खेळणे आणि कोचिंग करणे आवडते. भारतात क्रिकेट हा धर्म आहे. येथील चाहत्यांमध्ये कमालीचा झपाटलेपणा पहायला मिळतो. आयपीएल फ्रॅन्चायजीचा मुख्य कोच बनणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी लखनौ संघासोबत काम करण्यास फारच उत्सुक आहे.’
गोयंका म्हणाले, ‘खेळाडू आणि कोच या नात्याने ॲन्डी यांनी क्रिकेट इतिहासात वेगळा ठसा उमटविला आहे. आम्ही त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचा आदर बाळगतो. आमच्या ‘व्हिजन’नुसार ते काम करतील, अशी अपेक्षा बाळगतो. त्यांच्या मार्गदर्शनात आमचा संघ यशस्वी वाटचाल करेल, असा मला विश्वास वाटतो.’
ॲन्डी फ्लॉवर यांनी खेळाडू म्हणून झिम्बाब्वेसाठी मैदान गाजविल्यानंतर इंग्लंडचे राष्ट्रीय कोच म्हणून जबाबदारी सांभाळली. इंग्लंडने त्यांच्या मार्गदर्शनात २०१० ला टी-२० विश्वचषक जिंकला. नंतर कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थानावर झेप घेतली होती. गोयंका ग्रुपच्या आरपी- एसजी समूहाने लखनौ फ्रॅन्चायजीचे अधिकार ७०९० कोटी रुपयांत खरेदी केले होते.
‘लखनौ संघासोबत सार्थक आणि यशस्वी कार्य करीत आव्हाने पेलण्यास सज्ज असेन, असा मला विश्वास वाटतो. नव्या वर्षात उत्तर प्रदेशचा प्रवास करीत व्यवस्थापन तसेच सहयोगी स्टाफसोबत भेटण्यास मी उत्सुक आहे,’ असे फ्लॉवर यांनी म्हटले आहे.