नवी दिल्ली : वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी झिम्बाब्वेचा दिग्गज हिथ स्ट्रिकचं निधन झालं अन् क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली. काही दिवसांपूर्वी स्ट्रिकच्या निधनाची अफवा पसरली होती. पण, आता त्याच्या पत्नीनं मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू हिथ स्ट्रिक (Heath Streak) याचं वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या मृत्यूची बातमी पसरली होती. पण, आज झिम्बाब्वेच्या दिग्गजावर काळानं घाला घातला. हिथ स्ट्रिकच्या पत्नीनं त्याच्या निधनाचं वृत्त जाहीर केलं आहे. याआधी त्याच्या निधनाबद्दल अफवा पसरवण्यात आल्या होत्या, त्यावर दिग्गजानं संताप व्यक्त केला होता. झिम्बाब्वेच्या दिग्गजानं जगाचा निरोप घेतल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी त्याला श्रद्धांजली वाहिली.
माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हिथ स्ट्रिकच्या निधनावर दुःख व्यक्त केले. "हिथ स्ट्रिक हा केवळ महान क्रिकेटपटूच नव्हता तर एक चांगला माणूस देखील होता. त्याचं निधन एवढ्या कमी वयात झालं हा धक्काच आहे. त्याच्या निधनानं क्रिकेट जगतानं एक रत्न गमावलं आहे. त्याच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी माझ्या मनापासून संवेदना. त्याच्या आत्म्याला शांती लाभो", असे हरभजन सिंगने म्हटले.
तसेच हिथ स्ट्रिकचं निधन हे ऐकून दुःख झालं. ९० च्या दशकाच्या शेवटी आणि २००० च्या सुरुवातीच्या काळात झिम्बाब्वे क्रिकेटला नवीन उभारी देण्यात त्याची मोलाची कामगिरी होती. तो खूप स्पर्धात्मक होता. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना मनःपूर्वक संवेदना, अशा भावना सेहवागनं व्यक्त केल्या.
४९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास झिम्बाब्वेचा माजी दिग्गज हिथ स्टिकची पत्नी नदिनी हिने फेसबुकच्या माध्यमातून हिथ स्ट्रिकच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. अलीकडेच हिथ स्ट्रिकच्या मृत्यूबद्दल काही अफवा आणि खोट्या बातम्या देखील पसरल्या होत्या. हिथ स्ट्रिकने रविवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी जगाचा निरोप घेतला. दरम्यान, हिथ स्ट्रिकने झिम्बाब्वेसाठी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ६५ कसोटी आणि १८९ वन डे सामने खेळले आहेत. नोव्हेंबर १९९३ मध्ये त्याने झिम्बाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हिथ हा खूप चांगला अष्टपैलू खेळाडू होता. त्याने कसोटीच्या १०२ डावात गोलंदाजी करताना २८.१४ च्या सरासरीने २१६ बळी घेतले आहेत. तसेच १०७ कसोटी डावांमध्ये त्यानं १९९० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं एक शतक आणि अकरा अर्धशतके झळकावली आहेत.