Heath Streak Death । नवी दिल्ली : झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू हिथ स्ट्रिक (Heath Streak) याचं वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या मृत्यूची बातमी पसरली होती. पण, आज झिम्बाब्वेच्या दिग्गजावर काळानं घाला घातला. हिथ स्ट्रिकच्या पत्नीनं त्याच्या निधनाचं वृत्त जाहीर केलं आहे. याआधी त्याच्या निधनाबद्दल अफवा पसरवण्यात आल्या होत्या, त्यावर दिग्गजानं संताप व्यक्त केला होता. यावेळी त्याच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. या रोगाशी प्रदीर्घ लढाईनंतर दिग्गजाचा मृत्यू झाला.
'फ्री प्रेस जर्नल'ने दिलेल्या माहितीनुसार, झिम्बाब्वेच्या दिग्गजाची पत्नी नदिनी हिने फेसबुकच्या माध्यमातून हिथ स्ट्रिकच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. अलीकडेच हिथ स्ट्रिकच्या मृत्यूबद्दल काही अफवा आणि खोट्या बातम्या देखील पसरल्या होत्या. हिथ स्ट्रिकने रविवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी जगाचा निरोप घेतला.
दरम्यान, हिथ स्ट्रिकने झिम्बाब्वेसाठी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ६५ कसोटी आणि १८९ वन डे सामने खेळले आहेत. नोव्हेंबर १९९३ मध्ये त्याने झिम्बाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हिथ हा खूप चांगला अष्टपैलू खेळाडू होता. त्याने कसोटीच्या १०२ डावात गोलंदाजी करताना २८.१४ च्या सरासरीने २१६ बळी घेतले आहेत. तसेच १०७ कसोटी डावांमध्ये त्यानं १९९० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं एक शतक आणि अकरा अर्धशतके झळकावली आहेत.