मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विराट कोहली हा जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज असेल, परंतु कर्णधार म्हणून त्याला अजून बरेच काही शिकायचे आहे. त्यामुळे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघात असल्याने कोहलीला बरीच मदत मिळते. विशेषतः मर्यादित षटकांच्या सामन्यांत अनेक कठीण प्रसंगी धोनीचे निर्णय संघासाठी फायद्याचे ठरले आहेत. त्यामुळे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात धोनीचे असणे, फार महत्त्वाचे आहे.
कर्णधार कोहलीनं स्वतः याची कबुली दिलेली आहे. तो म्हणाला,''जेव्हा मी संघात दाखल झालो, त्यावेळी धोनीकडे अनेक पर्याय उपलब्ध होते आणि मिळालेल्या संधीचं मी सोनं केलं. त्याने दिलेला पाठींबा माझ्यासाठी महत्त्वाचा होता. त्यानेच मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली. अनेक युवा खेळाडूंना तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळत नाही. आता क्षेत्ररक्षकाची जागा ठरवताना, गोलंदाज बदली करताना त्याची खूप मदत होते. त्यामुळे आम्हा दोघांत एकमेकांबद्दल विश्वास आणि आदर आहे.''
धोनीच्या संथ फलंदाजीवर अनेकांनी टीका केली, परंतु वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर धोनीने आपल्या कामगिरीत सुधारणा केली. कोहली म्हणाला,''सामन्यातील प्रत्येक बारकावे धोनी चांगलेच जाणून असतो. पहिल्या चेंडूपासून ते 300 व्या चेंडूपर्यंतचा डाव त्याच्या डोक्यात सुरू असतो. त्याच्यासारखा खेळाडू संघात असणे हे मी माझे भाग्य समजतो. यष्टिंमागे धोनीसारखा खेळाडू असल्याचा संघाला खूप फायदा होतो. संघ व्यवस्थापन माही आणि रोहित यांच्यासोबत मी सतत रणनीतीची चर्चा करत असतो.''
''डेथ ओव्हरमध्ये मी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणाला असतो. हा माझा स्वभाव आहे. 30-35 षटकानंतर धोनीला माहीत असते की मी सीमारेषेजवळ आहे. त्यावेळी कॅप्टन म्हणून धोनी सक्रीय होतो,''असेही कोहली म्हणाला. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या 15 सदस्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेला भारतीय संघ संतुलित असल्याचे कोहलीने सांगितले.
कोहली 2011 आणि 2015 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत संघाचा सदस्य होता आणि 2019च्या वर्ल्ड कपचे त्याच्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे. तो म्हणाला,'' 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेत माझा अनेक निर्णयात सहभाग नव्हता. त्यामुळे संघातील प्रमुख खेळाडूंवर येणारे दडपण थेट माझ्यापर्यंत कधीच पोहोचले नाही. 2015मध्येही मी दबावापासून दूर होतो, परंतु आता कर्णधार असल्याने त्या परिस्थितीतून मला जावे लागत आहे.''