जोहान्सबर्ग - पहिल्या दोन कसोटी सामन्यातील संघ निवडीवरुन चौफेर टीका झेलणा-या कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या जोहान्सबर्ग कसोटीत रोहित शर्माच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी दिली. अजिंक्यची आतापर्यंतची परदेशातील कामगिरी उजवी असल्यामुळे सर्वांनाच अजिंक्यकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण संधी मिळूनही अजिंक्यला तिस-या कसोटीत प्रभाव पाडता आला नाही. अजिंक्य फक्त 9 धावांवर मॉर्नी मॉर्केलच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू बाद झाला.
महत्वाच म्हणजे अंतिम अकरामध्ये पुनरागमन करणा-या अजिंक्यला नशिबाने सुद्धा साथ दिली होती. पण त्याला त्याचा फायदा उचलता आला नाही. 49 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अजिंक्यने यष्टीपाठी क्विंटन डी कॉककडे झेल दिला. पण सुदैवाने तो चेंडू नो बॉल होता. त्यामुळे रहाणेला आणखी एक संधी मिळाली. 97 धावांवर भारताच्या तीन विकेट गेल्यानंतर अजिंक्य फलंदाजीसाठी मैदानात आला. 49 व्या फिलँडरच्या षटकात पंचांनी अजिंक्यला यष्टीपाठी झेलबाद दिले. पण टीव्ही रिप्लेमध्ये फिलँडरने टाकलेला नो बॉल असल्याचे दिसले. त्यामुळे थर्ड अंपायरने रहाणेला बाद देण्याचा निर्णय रद्द केला. पण रहाणेला या जीवदानाचा लाभ उचलता आला नाही. पुढच्याच तीन षटकात म्हणजेच 52 व्या षटकात मॉर्नी मॉर्केलच्या गोलंदाजीवर अजिंक्य पायचीत झाला.
केपटाऊन आणि सेंच्युरियन कसोटीत विराट कोहलीने फॉर्मच्या आधारावर रहाणेला राखीव खेळाडूंमध्ये बसवून रोहित शर्माला संधी दिली होती. पण रोहितला चार डावात फक्त 78 धावा करता आल्या. त्यामुळे विराटवर जोरदार टीका झाली. परदेशात चांगला रेकॉर्ड असणा-या अजिंक्य रहाणेला का बसवून ठेवले ? असा प्रश्न माजी क्रिकेटपटूंपासून सर्वसामान्य क्रिकेट चाहते विचारत होते. आधीच मालिका गमावल्यामुळे तिस-या कसोटीत संघ बदल आवश्यक होता. त्यादुष्टीने विराटने रोहितच्या जागी अजिंक्यला आणि अश्विनच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी दिली. पण अजिंक्य रहाणे पहिल्या डावात अपयशी ठरला.