राज ठाकरेंनी केली नाणेफेक; महिला टी-२० स्पर्धेला दिमाखात सुरुवात

प्रकाश पुराणिक स्मृती महिला टी-२० स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन केले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलामी सामन्यासाठी नाणेफेक करत या स्पर्धेची दिमाखात सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 02:55 PM2024-02-20T14:55:45+5:302024-02-20T14:56:29+5:30

whatsapp join usJoin us
founding chairperson of MNS Raj Thackeray flip the toss in Women's T20 tournament begins from today at Mumbai | राज ठाकरेंनी केली नाणेफेक; महिला टी-२० स्पर्धेला दिमाखात सुरुवात

राज ठाकरेंनी केली नाणेफेक; महिला टी-२० स्पर्धेला दिमाखात सुरुवात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माहिम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आणि शिवाजी पार्क जिमखान्याचे सचिव म्हणून यशस्वी कामगिरी सांभाळणारे माजी क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक यांच्या क्रिकेट आणि संघटन कौशल्याला मानाचा मुजरा करण्यासाठी दोन्ही दिग्गज संस्थांनी एकत्र येऊन प्रकाश पुराणिक स्मृती महिला टी-२० स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन केले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलामी सामन्यासाठी नाणेफेक करत या स्पर्धेची दिमाखात सुरुवात केली. मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) सचिव अजिंक्य नाईक यांचीही यावेळी उपस्थिती होती.

या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी १६ महिला संघ एकमेकांविरुद्ध भिडणार असून स्पर्धेतील सर्व सामने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या (शिवाजी पार्क) चार मैदानांवर २० ते २३ फेब्रूवारीदरम्यान रंगतील. स्वत: उत्तम क्रिकेटपटू राहिलेले दिवंगत प्रकाश पुराणिक यांनी माहिम ज्युवेनाईल आणि शिवाजी पार्क जिमखाना या दोन्ही क्लबचा कार्यभार यशस्वीपणे हाताळला होता. त्यांचे क्रिकेटप्रेम आणि त्यांच्या क्लब कारकीर्दीला सलाम ठोकण्यासाठी हे दोन्ही क्लब एकत्र आले आणि त्यांनी गेल्या वर्षापासून प्रकाश पुराणिक स्मृती करंडक स्पर्धेचे आयोजन सुरू केले.
 
मंगळवारी या स्पर्धेला आणि महिला क्रिकेटपटूंना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहिले. त्यांनी राजावाडी क्रिकेट क्लब विरुद्ध दहिसर स्पोर्ट्स क्लब या सलामी लढतीसाठी नाणेफेक करत स्पर्धेचे उद्घाटन केले. महिला क्रिकेटला नवी उभारी मिळावी म्हणून आयोजित झालेल्या या स्पर्धेच्या विजेत्या संघाला प्रकाश पुराणिक चषकासह ५० हजार रुपयांचे रोख इनामही दिले जाणार आहे. उपविजेता संघ २५ हजार रुपयांचा मानकरी ठरले. तसेच उपांत्य पराभूत संघांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असून अनेक वैयक्तिक पुरस्कारही ठेवण्यात आल्याची माहिती सचिव सुनील पाटील आणि कोषाध्यक्ष महेश शेट्ये यांनी दिली.
 
१६ संघांचा स्पर्धेत सहभाग
या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये राजावाडी आणि दहिसर या संघांसह ग्लोरियस क्रिकेट क्लब, पय्याडे स्पोर्ट्स क्लब, स्पोर्टिंग युनियन, वेंगसरकर फाउंडेशन, जे. भाटिया स्पोर्ट्स, स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब, रिगल क्रिकेट क्लब, डी. डीव्हीजन विजेता, पीडीटीएसए स्पोर्ट्स क्लब, फोर्ट यंगस्टर्स, व्हिक्टरी क्रिकेट क्लब, बोरीवली क्रिकेट क्लब, सी डिव्हीजन विजेता आणि भारत क्रिकेट क्लब या संघांचा समावेश आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बाद फेरी, दुसऱ्या दिवशी उपांत्यपूर्व फेरी आणि तिसऱ्या दिवशी उपांत्य सामने खेळविले जातील. जेतेपदाची लढत शुक्रवारी दुपारी २ वाजता माहिम ज्युवेनाईलच्या मैदानावर खेळविली जाईल.

Web Title: founding chairperson of MNS Raj Thackeray flip the toss in Women's T20 tournament begins from today at Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.