भारतीय संघ हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम संघांमध्ये आघाडीवर आहे. कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये हुकुमत गाजवण्याची क्षमता टीम इंडियात आहे. तसे प्रतिभावान खेळाडू टीम इंडियाकडे आहेत. पण, टीम इंडियातील अशा काही खेळाडूंना प्रतिभा असूनही कर्णधाराचा हवा तितका पाठींबा मिळाला नाही. त्यामुळे क्रिकेटमधील शापित गंधर्व अशी त्यांची ओळख निर्माण झाली. आज आपण अशा चार खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत. कर्णधाराचा आधार नसल्यानं या खेळाडूंचे करिअर झटक्यात संपले.
2011 ते 2017 या कालाधीत आर अश्विन हे नाव टीम इंडियाचा प्रमुख फिरकीपटू म्हणून गाजलं. सध्या याच खेळाडूला संघातील अंतिम अकरामध्ये स्थान पटकावण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं त्याला पाठींबा दिला आणि अश्विननं त्याचा विश्वास नेहमी सार्थ ठरवला. 2017मध्ये धोनीनं मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडलं आणि अश्विनचे करिअरही जवळपास संपुष्टात आले. जुलै 2017नंतर अश्विन मर्यादित षटकांचा सामना खेळलेला नाही.
अमित मिश्रा टीम इंडियाकडून अखेरचा वन डे सामना केव्हा खेळला हे गुगल सर्च करावं लागेल. त्यानं अखेरच्या वन डे मालिकेत सामनावीर आणि मालिकावीर हे दोन्ही पुरस्कार पटकावले होते. पण, त्याला कर्णधाराचा हवा तसा पाठींबा मिळाला नाही. 2016मध्ये त्याला इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील अंतिम अकरातून वगळले आणि त्याचवर्षी तो अखेरचा कसोटी सामनाही खेळला. दुखापतीमुळे संघातून वगळल्यानंतर त्याचे पुनरागमन झालेच नाही.
37 वर्षीय अमित मिश्रानं 2003मध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याला कोणत्याही कर्णधारानं पाठींबा मिळाला नाही. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्या उपस्थितीत त्यानं क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यामुळे त्याला फार संधी मिळाली नाही. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या काळात अश्विन हाच प्रमुख फिरकीपटू राहिला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली त्याला केवळ दोन ट्वेंटी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यातही त्यानं चांगली कामगिरी केली, परंतु त्याला संधी देण्यात आली नाही.खेळाडूनं शतक झळकावल्यानंतर पुढील पाचेक सामने तरी संघातील स्थान पक्क झाल्यात जमा असते, परंतु मनोज तिवारीच्या बाबतीत हे घडलं नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध 2011मध्ये शतकी केळी केल्यानंतरही त्याला सात महिने अंतिम अकरामधून बाहेर रहावे लागले. पण, त्याहीनंतर केवळ दोन सामने खेळवून त्याला बाकावर बसवण्यात आले. पुढील संधीसाठी त्याला दोन वर्ष वाट पाहावी लागली. धोनीनं त्याला फार संधी दिली नाही. तो केवळ 12 वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळला. 2017-18मध्ये तो अष्टपैलू म्हणून समोर आला, परंतु तरीही त्याला संधी मिळाली नाही. त्यानं बीसीसीआयच्या निवड प्रक्रियेवर जाहीर नाराजीही प्रकट केली होती. नुकतंच त्यानं रणजी करंडक स्पर्धेत तिहेरी शतक झळकावलं आहे. जानेवारी 2018मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अजिंक्य रहाणे हा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज असेल, असे जाहीर केले होते. पण, सहा सामन्यानंतर त्याला संघातूनच वगळण्यात आले. फेब्रुवारी 2018नंतर त्यानं वन डे सामना खेळलेला नाही. अंबाती रायुडूला वगळल्यानंतरही रहाणेला संधी देण्यात न आल्यानं सर्वांना आश्चर्य वाटले होते. मर्यादित षटकांच्या सामन्यातं रहाणेला कोहलीचा पाठींबा मिळालेला नाही. 2017मध्ये रहाणेनं सलग पाच वन डे सामने खेळले होते आणि तेही रोहित शर्माला विश्रांती दिल्यामुळे. श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत रोहितनं नेतृत्व केलं आणि त्यानंही रहाणेला डावललं.