कराची : भारत आणि पाकिस्तानचा सहभाग असलेली चार देशांची एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा व्हावी, यासाठी आपण आग्रही असून यासंबंधीचा प्रस्ताव १९ मार्च रोजी दुबईत होणाऱ्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली यांच्यासमक्ष ठेवू, अशी माहिती पीसीबी प्रमुख रमीझ राजा यांनी मंगळवारी दिली.
रमीझ यांनी नॅशनल स्टेडियममध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, भारत - पाकसह इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ या स्पर्धेत सहभागी व्हायला हवेत असे मला वाटते. भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना एकमेकांविरुद्ध खेळायला मिळावे, हा यामागील हेतू आहे. आयसीसीच्या अन्य देशांचा आर्थिक लाभ व्हावा, असे देखील पीसीबीला वाटते. दुबईत एसीए बैठकीत याबाबत गांगुलींशी बोलणार आहे. आम्ही दोघे आपापल्या संघांचे माजी कर्णधार आणि खेळाडू आहोत.
दोघांसाठी क्रिकेट राजकारणापलीकडचे आहे. भारताने नकार दिला तरीही पाकिस्तानात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा सहभाग असलेली तिरंगी मालिका खेळविण्याची आपली तयारी असेल. भारतीय संघ पुढच्यावर्षी आशिया चषक खेळण्यास पाकिस्तानात येईल, असा मला विश्वास वाटतो. भारतीय संघ आला नाही तर काय करायचे, ते नंतर बघू. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मात्र याआधीच पीसीबी प्रमुखांचा असा प्रस्ताव फेटाळून लावला, हे विशेष.