कोची, दि. 16 - भारताचा माजी गोलंदाज एस. श्रीशांतने चार वर्षांच्या कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले आहे. मॅच फिक्सिंगप्रकरणी एस. श्रीशांतवर घालण्यात आलेली बंदी तब्बल चार वर्षानंतर उठविल्यानंतर काल(मंगळवारी) स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तो मैदानात उतरला आणि सामन्यात फलंदाजी केली. प्रोड्यूसर इलेव्हन आणि प्लेबॅक सिंगर इलेव्हन या दोन संघामध्ये सामना पार पडला. प्लेबॅक सिंगर इलेव्हन संघात श्रीशांतचा समावेश होता. या सामन्यात श्रीशांतने फलंदाजीने सुरुवात केली. या सामन्यानंतर बोलताना श्रीशांत म्हणाला की, मैदानावर परतल्याने मला खूप आनंद झाला आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. 2013 मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने श्रीशांतवर आजीवन बंद घातलेली होती. त्याविरोधात श्रीशांतने केरळ हायकोर्टात धाव घेतली होती. 2013 सालच्या आयपीएलमध्ये श्रीशांतसह अजित चंडेला आणि अंकित चव्हाण हे राजस्थान रॉयल्सचे तीन शिलेदार स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले होते. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने 2015 साली तिघांसह 36 जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मात्र, न्यायालयाने निर्दोश मुक्तता केली असली तरी बीसीसीआयने श्रीशांतवरील बंदी कायम ठेवली होती. याविरोधात श्रीशांतने कोर्टाचे दरवाजे ठोठावले असता, कोर्टानेच बीसीसीआयला बंदी हटवण्याचे आदेश दिले.
मी भीक मागत नाही, माझा हक्क मागतोय - श्रीशांतबीसीसीआयने श्रीशांतच्या आजीवन क्रिकेट खेळण्यावरील बंदी हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर श्रीशांत संतप्त झाला असून, मी तुमच्याकडे भीक मागत नाही, असे त्याने बीसीसीआयला सुनावले आहे. मी तुमच्याकडे भीक मागत नाही. उदरनिर्वाहाचे साधन परत मागतोय. तो माझा अधिकार आहे. तुम्ही देवापेक्षा मोठे नाहीत असे टि्वट करुन त्याने बीसीसीआयवरील राग व्यक्त केला.