वेलिंग्टन : मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघ शुक्रवारी येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या चौथ्या टी२० सामन्यात राखीव खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. त्याचवेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला यजमान संघाविरुद्ध आपल्याच धुंदीत राहता येणार नाही. भारतीय संघाला गेल्या दौºयात निराशाजनक पराभव पत्करावा लागला होता.मोहम्मद शमीचे अखेरचे शानदार षटक आणि रोहित शर्माची तडाखेबंद फलंदाजी या जोरावर भारताने बुधवारी न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करीत पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताने न्यूझीलंडमध्ये प्रथमच मालिका जिंकली. दोन्ही संघ गुरुवारी हॅमिल्टनहून वेलिंग्टनला पोहचले आणि शनिवारी माऊंट मोनगानुईला रवाना होतील. येथे रविवारी अखेरचा टी२० सामना होणार असल्याने दोन्ही संघांना सरावासाठी अधिक वेळ मिळणार नाही.पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका सहजासहजी बघायला मिळत नाही आणि भारताने मालिका जिंकलेली असल्यामुळे दोन्ही संघ यंदाच्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर उर्वरित सामन्यांत सर्व प्रयोग होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाला ५-० असा व्हाईटवॉश देण्याची संधी आहे.भारताने प्रयोग करण्याचे ठरविल्यास संजू सॅम्सन व रिषभ पंत यांना संधी मिळू शकते. पंतला अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे, पण त्याची निवड करताना कोणत्या फलंदाजाला वगळण्यात येईल आणि लोकेश राहुल यष्टिरक्षण करणार की नाही, याबाबत उत्सुकता राहील. आघाडीच्या तीन फलंदाजांमध्ये रोहित शर्मा, राहुल व कोहली यांचे स्थान पक्के असून श्रेयस अय्यर शानदार फॉर्मात आहे. मनीष पांडे आणि शिवम दुबे यांना अधिक संधी देणे आवश्यक आहे. त्याचवेळी, पुढील दोन सामन्यात रोहित किंवा कोहली यांना प्रत्येकी एका लढतीत विश्रांती मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.गोलंदाजीत बदल होण्याची जास्त अपेक्षा आहे. वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव व नवदीप सैनी संधीची प्रतीक्षा करीत आहे. तिघांना एकाचवेळी संधी मिळणार नाही, पण संघव्यवस्थापन एक फिरकीपटू व एक वेगवान गोलंदाज यांना रोटेट करू शकते. सुंदर आॅस्ट्रेलियातील मोठ्या मैदानांवर कोहलीच्या नव्या चेंडूच्या रणनीतीचा भाग आहे आणि त्याला पुढील दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते. शार्दुल ठाकूरच्या स्थानी सैनीला अंतिम ११ खेळाडूत स्थान मिळू शकते. जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबतही निर्णय होऊ शकतो. हॅमिल्टनमध्ये बुमराह महागडा ठरला होता. त्याचा एकदिवसीय व कसोटी संघातही समावेश आहे. त्याच्यावरील वर्कलोड बघता त्याला विश्रांती देण्याची शक्यता नाकारता येत नाही.न्यूझीलंडच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल निश्चित आहे. कोलिन डी ग्रँडहोमला अंतिम दोन सामन्यांसाठी संघात स्थान मिळालेले नाही आणि त्याच्या स्थानी फलंदाज टॉम ब्रुसचा समावेश करण्यात आला आहे. यजमान संघ आपली फलंदाजीची बाजू मजबूत करू शकतो कारण आतापर्यंत त्यांच्या मधल्या फळीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार केन विलियम्सनने डावाची सुरुवात करायला हवी, असा मतप्रवाह आहे. हॅमिल्टनमध्ये शानदार खेळी करणारा विलियम्सन जर मार्टिन गुप्तीलसह डावाची सुरुवात करेल, तर कॉलिन मन्रोला फलंदाजीसाठी उशीराने येईल. मिशेल सँटनरला बुधवारी फलंदाजी क्रमात बढती मिळाली होती, पण त्यामुळे न्यूझीलंड अशा प्रकारचे प्रयोग कायम राखतो का, याची उत्सुकता आहे. (वृत्तसंस्था)प्रतिस्पर्धी संघ :भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅम्सन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.न्यूजीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगेलिन, कोलिन मुन्रो, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सँटनर, टीम सीफर्ट, हामिश बेनेट, ईश सोढी, टीम साऊदी आणि ब्लेयर टिकनर.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- न्यूझीलंडविरुद्ध आज चौथी लढत; भारतीय संघ राखीव खेळाडूंना संधी देण्याची शक्यता
न्यूझीलंडविरुद्ध आज चौथी लढत; भारतीय संघ राखीव खेळाडूंना संधी देण्याची शक्यता
भारताने प्रयोग करण्याचे ठरविल्यास संजू सॅम्सन व रिषभ पंत यांना संधी मिळू शकते.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 5:30 AM