नवी दिल्ली : भारताने विश्वकप २०१५ नंतर आतापर्यंत ७२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात ११ खेळाडूंना चौथ्या क्रमांकावर संधी देण्यात आली. पण कर्णधार विराट कोहलीला प्रथमच या क्रमांकासाठी अंबाती रायुडू फिट असल्याचे वाटले आहे.
विशेष म्हणजे रायुडू केवळ चार डावांमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला असून, त्याने ७२.३३ च्या सरासरीने २१७ धावा केल्या आहेत. त्यात सोमवारी मुंबईत वेस्ट इंडिजविरुद्ध फटकावलेल्या शतकाचाही समावेश आहे. त्यानंतर कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माने रायुडूला या स्थानासाठी सर्वात उपयुक्त फलंदाज असल्याचे म्हटले आहे.
आशिया कपमध्ये कोहलीच्या अनुपस्थितीत रायुडूने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. तेथे त्याने सातत्य दाखवले. कर्णधाराच्या पुनरागमनानंतर त्याला चौथ्या स्थानावर संधी देण्यात आली. त्यात तो यशस्वी ठरला. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत संघाचे नेतृत्व करणाºया रोहित शर्माला वाटते की, प्रदीर्घ कालावधीपासून चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाबाबतच्या अडचणीवर तोडगा निघाला आहे.
रहाणे, युवी छाप पाडण्यात अपयशी
अजिंक्य रहाणे एकेकाळी चौथ्या क्रमांकासाठी आदर्श फलंदाज मानल्या जात होता, पण त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. रहाणेने चौथ्या क्रमांकावर १० डावांमध्ये ४६.६६ च्या सरासरीने ४२० धावा केल्या आहेत. त्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. रहाणे सध्या एकदिवसीय संघातून बाहेर आहे.
युवराज सिंगनेही ९ डावांमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने ४४.७५ च्या सरासरीने ३५८ धावा केल्या. त्यात एका १५० धावांच्या खेळीचा समावेश आहे. त्याला काही विशेष छाप सोडता आली नाही. त्यामुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागेल. दिनेश कार्तिक (९ डावांमध्ये ५२.८० च्या सरासरीने २६४ धावा) आताही या स्थानासाठी प्रयत्न करू शकतो.
याव्यतिरिक्त मनीष पांडे (७ डाव, १८३ धावा), हार्दिक पांड्या (५ डाव, १५० धावा), मनोज तिवारी (३ डाव, ३४ धावा), लोकेश राहुल (३ डाव २६ धावा) आणि केदार जाधव (३ डाव, १८ धावा) यांनीही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली, पण त्यांना छाप सोडता आलेली नाही.
कोहली म्हणाला...
रायुडूने मिळालेल्या संधीचा लाभ घेतला. आम्हाला २०१९ विश्वकप स्पर्धेपर्यंत त्याचे समर्थन करण्याची गरज आहे. त्याला खेळाची चांगल्या प्रकारे जाण आहे. चौथ्या क्रमांकावर हुशार फलंदाज फलंदाजी करीत असल्याचा आम्हाला आनंद आहे.’
रोहित म्हणाला...
चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाबाबतचे सर्व प्रश्न मिटले असतील, अशी आशा आहे. आता विश्वकप स्पर्धेपर्यंत चौथ्या क्रमांकाबाबत कुठली चर्चा व्हायला नको, असे मला वाटते.’
विश्वकप स्पर्धा पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणार आहे. रायुडूला अलीकडेच इंग्लंड दौºयावर जाता आले नाही; कारण तो यो-यो चाचणीत अपयशी ठरला होता. आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वकप स्पर्धेनंतर भारताने ११ फलंदाजांना चौथ्या क्रमांकावर संधी दिली. त्यात महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक ११ डावांमध्ये या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने ३२.८१ च्या सरासरीने ३६१ धावा केल्या.
Web Title: The fourth highest number of 11 batsmen took the test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.