अहमदाबाद : तीनपैकी दोन लढतींत अपेक्षेनुसार न खेळणाऱ्या भारतीय संघाला गुरुवारी चौथ्या सामन्यात इंग्लंडसाख्या बलाढ्य संघावर विजय मिळविण्यासाठी अष्टपैलू कामगिरी करण्याचे आव्हान असेल. मालिकेतील निकालाच्या दृष्टीने ‘करा किंवा मरा’ अशी ही लढत असेल. त्यासाठीच नाणेफेक गमावली तरी निकालावर परिणाम होणार नाही, याचीही काळजी यजमानांना घ्यावी लागेल. (Fourth T20 match against England today, aiming to maintain the challenge; The need to improve the game in power play)आतापर्यंत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे. कर्णधार विराट कोहली मात्र सातत्यपूर्ण कामगिरीवर भर देत आहे. घरच्या मैदानावर होणारे विश्वचषकाचे आयोजन पाहता, आधी फलंदाजी केली, तरी किंवा लक्ष्याचा पाठलाग करतानाही चांगली कामगिरी व्हायलाच हवी, असे विराटचे मत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना जे दोन सामने गमावले, त्यात पाॅवर प्लेमधील उणिवा चव्हाट्यावर आल्याने संघर्ष करावा लागला. दोन्ही सामन्यांत केवळ एका फलंदाजाने झुंज दिली होती. तसेचम् लोकेश राहुलच्या खराब फॉर्मचा फटका बसला.मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीच्या सहा षटकांत भारताच्या फलंदाजांना अक्षरश: बांधून ठेवले होते. या दोघांनी गडी बाद करण्यासह खेळपट्टीवर उसळीचा लाभ घेतला. यामुळे तिसऱ्या पराभवानंतर विराटचे वक्तव्य पाहता हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह आणखी एक अष्टपैलू खेळाडूचा समावेश होण्याची शक्यता आहे. राहुल तेवतिया किंवा अक्षर पटेल यांपैकी एकाची वर्णी लागू शकते. तिसऱ्या सामन्यात भारताची गोलंदाजीही दुबळी होती. जोस बटलरने प्रत्येक गोलंदाजाला चोप दिला. युझवेंद्र चहलनेही भरपूर धावा मोजल्या. हार्दिक गोलंदाजी करतो; पण अद्याप त्याला गडी बाद करण्यात यश आलेले नाही. दुखापतीतून सावरलेला भुवनेश्वर कुमार चांगला मारा करीत असला, तरी नव्या चेंडूवर गडी बाद करणे त्याच्याकडून अपेक्षित आहे. ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर याने मात्र प्रभावी मारा करीत चार गडी बाद केले आहेत.
इंग्लंड मलानच्या प्रतीक्षेतभारत मालिकेत माघारला असला, तरी अंतिम संघात फारसे बदल होतील, असे दिसत नाही. इंग्लंडही प्रत्येक परिस्थितीत विजय मिळविण्याच्या जिद्दीने खेळत असून आहे. बटलरला गवसलेला सूर भारतासाठी चिंतेचा विषय ठरावा. त्याची बॅट तळपली तर त्याला रोखणे कठीण आहे. कसोटी मालिकेत अपयशी ठरलेल्या बेयरेस्टॉनेही मंगळवारी नाबाद ४० धावा केल्या. पाहुण्यांना आता प्रतीक्षा असेल ती डेव्हिड मलानच्या फॉर्मची.
प्रतिस्पर्धी संघभारत विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतिया, इशान किशन.इंग्लंड इयोन मोर्गन (कर्णधार), जोस बटलर, जेसन रॉय, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल राशीद, रीस टॉपले, क्रिस जोर्डन, मार्क वूड, सॅम कुरेन, टॉम कुरेन, सॅम बिलिंग्स, जॉनी बेयरस्टॉ आणि जोफ्रा आर्चर.