मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमावर कोरोना व्हायरस व फ्रँचायझी मालकांचे बंड असे दुहेरी संकट आले आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने गेल्या आठवड्यात बक्षीस रकमेत कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरुद्ध सर्व ८ फ्रँचायझी मालक एकवटले आहेत. सर्वांनी एका पत्रावर स्वाक्षरी करून आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलकडे आपली नाराजी जाहीर केली.
यंदाच्या विजेत्यासह प्ले ऑफपर्यंत मजल मारणाऱ्या संघाच्या बक्षीस रकमेत ५०% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याविरोधात शाहरूख खान (कोलकाता नाईट रायडर्स), आकाश अंबानी (मुंबई इंडियन्स), कासी विश्वनाथन (चेन्नई सुपर किंग्ज, मुख्य कार्यकारी अधिकारी) व पार्थ जिंदाल (दिल्ली कॅपिटल्स) यांनी स्वाक्षरी केलेले पत्र पाठविले आहे. बक्षीस कपातीचा निर्णय घेताना आयपीएलने फ्रँचायझी मालकांना विश्वासात घेतले नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. आयपीएलचे हे निर्णय म्हणजे मनमानी कारभार असल्याची टीका फ्रँचायझी मालकांनी केली.विराट कोहलीच्या आरसीबीला मोठा धक्काकोरोना व्हायरसमुळे यंदाच्या आयपीएलवर संकट आले असताना मंगळवारी कर्नाटक राज्य सरकारने आयपीएल सामने खेळविण्यास नकार दिल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) मोठा धक्का बसला आहे.कर्नाटकमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची माहिती कर्नाटक वैद्यकीय शिक्षक मंत्री के. सुधाकर यांनी दिली. बंगळुरू येथील आयटी कंपनीजवळील सर्व प्राथमिक शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. आयपीएलदरम्यात कोरोना व्हायरस अजून पसरण्याची भीती असताना, ‘आयपीएल निर्धारित वेळापत्रकानुसार होईल,’ असा विश्वास बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केला. मात्र आता कर्नाटक सरकारने आयपीएल पुढे ढकलावी किंवा रद्दच करावी, अशी विनंती करणारे पत्र केंद्र सरकारला पाठविल्याचे वृत्त सूत्रांकडून मिळाले. कर्नाटक राज्य सरकारने आयपीएल आयोजित करण्यास नकार दिल्यास आरसीबी कर्णधार विराट कोहलीसाठी हा मोठा धक्काच असेल.म्हणून झाला निर्णय!आयपीएलमधील विजेत्या संघाला यंदा १० कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील. २०१९च्या विजेत्या संघाला २० कोटी रुपये मिळाले होते. उपविजेत्याला १२.५ कोटींऐवजी ६.२५ कोटी देण्यात येतील. क्वालिफायर सामन्यातील दोन संघांना प्रत्येकी ४.३७ कोटी रुपये मिळतील. प्ले आॅफ गाठणाºया चार संघांमध्ये ५० कोटींची बक्षीस रक्कम विभागली जाते. २०१४च्या मोसमापासून फ्रँचायझी मालकांना आर्थिक मदत मिळावी म्हणून बीसीसीआयने बक्षीस रक्कम वाढविण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता फ्रँचायझी स्पॉन्सरशिप, प्रायोजक आदींमधून अनेक महसूल कमवत आहेत. त्यामुळे बक्षीस रक्कम करारानुसारच देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.मालकांच्या मागणीला केराची टोपली?आयपीएल विजेत्यांच्या बक्षीस रकमेतील कपातीच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी फ्रँचायझी मालकांनी स्वाक्षरी करून एक पत्र बीसीसीआयला मेल केले. पण, त्यांच्या या मेलला बीसीसीआयकडून केराची टोपली दाखविण्याची शक्यता अधिक आहे.‘२०१३मध्ये आयपीएलमधून हवा तसा आर्थिक फायदा मिळत नसल्याचे फ्रँचायझींनी सांगितले होते. तेव्हा त्यांनी आमच्याकडे मदत मागितली होती. यासाठी बीसीसीआयने मदत करण्याचा निर्णय घेतला. आता फ्रँचायझींना मोठा फायदा होत असून त्यामुळे बक्षीस रक्कम कमी करण्यात आली आहे,’ असे आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले होते. ‘आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत फ्रँचायझींच्या मतावर चर्चा केली जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, परंतु आमच्या निर्णयात बदल होण्याची शक्यता फार कमी आहे,’ असेही पटेल यांनी सांगितले आहे.