Join us  

फ्रेंचाइजींची खेळाडू निवडण्यासाठी कसोटी लागेल - रॉबिन उथप्पा

‘आयपीएल’ लिलावासाठी मी खूप उत्साहित असून, कोणते खेळाडू त्याच संघात राहणार आहेत, हे अद्याप कळले नाही. येत्या दोन आठवड्यांत ते कळेलच, पण या वेळी फ्रेंचाइजींची उत्कृष्ट खेळाडू निवडण्यासाठी कसोटी लागेल, असे मत स्टार फलंदाज रॉबिन उथप्पा याने ‘लोकमत’कडे व्यक्त केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 7:47 PM

Open in App

 - रोहित नाईक मुंबई  - ‘आयपीएल’ लिलावासाठी मी खूप उत्साहित असून, कोणते खेळाडू त्याच संघात राहणार आहेत, हे अद्याप कळले नाही. येत्या दोन आठवड्यांत ते कळेलच, पण या वेळी फ्रेंचाइजींची उत्कृष्ट खेळाडू निवडण्यासाठी कसोटी लागेल, असे मत स्टार फलंदाज रॉबिन उथप्पा याने ‘लोकमत’कडे व्यक्त केले. सध्या भारतीय संघाबाहेर असलेला उथप्पा देशांतर्गत स्पर्धांमध्ये मात्र छाप पाडत आहे. ‘आयपीएल’बाबत त्याने म्हटले की, ‘यंदा सर्वच खेळाडूंचा नव्याने लिलाव होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे. तरी या वेळी खेळाडूंपेक्षा फ्रेंचाइजीसाठी या वर्षीचा लिलाव कठीण असेल. दीर्घ काळासाठी विचार केल्यास, प्रत्येक संघासाठी भारतीय खेळाडू खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कितीही झाले, तरी आपल्याला स्वीकार करावे लागेल की, ही आपली लीग आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू निर्णायक भूमिका बजावतील.’ भारतीय खेळाडूंच्या महत्त्वाविषयी उथप्पा म्हणाला की, ‘आतापर्यंत आयपीएल सत्रांमध्ये भारतीय खेळाडूंचे योगदान मोलाचे राहिले आहे. अनेक संघांतून भारतीयांनी छाप पाडली आहे, शिवाय प्रत्येक फ्रेंचाईजीचा प्रयत्न असेल की, त्यांच्या प्रमुख खेळाडूंची फळी ही भारतीय खेळाडूंची असेल. कारण माझ्या मते, जेव्हा प्रमुख खेळाडू किंवा युवा खेळाडू भारतीय असतात, तेव्हा त्यांना परदेशी खेळाडू प्रोत्साहन देतात. याचा फायदा भारतीय खेळाडूंना आणि संघाला अधिक होतो.’ यंदाच्या रणजी मोसमात उथप्पाने कर्नाटकला सोडचिठ्ठी देत सौराष्ट्रची वाट धरली. याबाबत उथप्पाने म्हटले की, ‘यंदाचे रणजी सत्र नक्कीच आव्हानात्मक होते. १५ वर्षे एका संघात राहिल्यानंतर नव्या संघाशी जुळवून घेताना खूप तडजोड करावी लागते. खेळाडूंशी संभाषण, त्यांची मानसिकता सांभाळतानाच मला स्वत:चा खेळही सिद्ध करायचा होता, पण एक संघ म्हणून आम्ही चांगले प्रदर्शन केले. सौराष्ट्रकडून खेळण्याचा अनुभव अप्रतिम होता. वैयक्तिकरीत्या माझ्यासाठी हे सत्र आव्हानात्मक होते, पण आम्ही सांघिक प्रदर्शन केले.’ त्याचप्रमाणे, ‘मी कधीही हार पत्करत नाही. भारतीय संघात पुनरागमनासाठी माझे प्रयत्न सुरू असून, मी मेहनत घेत आहे. मी माझे प्रदर्शन करत राहणार आणि देवाच्या कृपेने लवकरच भारतीय संघात परतेल,’ असेही उथप्पाने  म्हटले. कर्णधार विराट कोहलीबाबत उथप्पाने सांगितले की, ‘कोहलीचे आक्रमक नेतृत्त्व भारतासाठी महत्त्वाचे आहे. कोहली कर्णधार म्हणून जबरदस्त प्रदर्शन करत असून, तो खेळाडूंना कायम प्रोत्साहन देत राहतो, शिवाय वैयक्तिक कामगिरीने तो संघाला प्रेरित करत आहे. अशाच कामगिरीची संघाला गरज आहे.’ प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मताशी मी सहमत आहे. दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी नक्कीच आपली गोलंदाजी मजबूत आहे. फलंदाजीच्या तुलनेत गोलंदाजीत तडजोड करणे कठीण जाणार नाही. कारण उसळी व वेगवान खेळपट्ट्यांवर फलंदाजांची मोठी परीक्षा होईल. संघनिवडही खेळपट्टीनुसार होणार असल्याने, फलंदाजांवर मोठी जबाबदारी राहील. फलंदाजांना आफ्रिकेत सराव मिळायला पाहिजे. - रॉबिन उथप्पा

टॅग्स :क्रिकेटभारत