Join us  

क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी! डकवर्थ-लुईस नियम बनवणारे फ्रँक डकवर्थ यांचे ८४व्या वर्षी निधन

Frank Duckworth Passes Away: फ्रँक डकवर्थ हे इंग्लंडचे संख्याशास्त्रज्ञ होते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 2:42 PM

Open in App

Frank Duckworth Passes Away: टी२० विश्वचषक स्पर्धा सुरु असतानाच क्रिकेटविश्वात एक दुखद घटना घडली. क्रिकेट जगतात डकवर्थ लुईस-स्टर्न (DLS) नियम आणणाऱ्या फ्रँक डकवर्थ यांचे निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फ्रँक डकवर्थ हे इंग्लंडचे संख्याशास्त्रज्ञ होते. इएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, फ्रँक डकवर्थ यांचे २१ जून रोजी निधन झाले. डकवर्थ-लुईस पद्धत डकवर्थ आणि त्यांचे सहकारी सांख्यिकीशास्त्रज्ञ टोनी लुईस यांनी विकसित केली होती. पावसामुळे प्रभावित झालेल्या क्रिकेट सामन्यांच्या निकालाचा अंदाज लावण्यासाठी ही पद्धत वापरली जाते.

DLS ही प्रणाली प्रथम १९९७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू करण्यात आली होती आणि 2001 मध्ये आयसीसीने षटकांची संख्या कमी केलेल्या सामन्यांमध्ये सुधारित आव्हान देण्यासाठी ही प्रणाली स्वीकारली होती. डकवर्थ आणि लुईस यांच्या निवृत्तीनंतर आणि ऑस्ट्रेलियन सांख्यिकीशास्त्रज्ञ स्टीव्हन स्टर्न यांनी काही बदल केले आणि या पद्धतीला डकवर्थ-लुईस-स्टर्न म्हणजेच DLS पद्धत असे नाव देण्यात आले. डकवर्थ आणि लुईस या दोघांना जून २०१० मध्ये 'मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (MBE) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दरम्यान, DLS कार्यपद्धती एका क्लिष्ट अशा संख्यागणिती विश्लेषणावर आधारित आहे. त्यात आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या फलंदाजांना सुधारित आव्हान देण्यासाठी उर्वरित विकेट आणि षटके यांसह विविध घटकांचा विचार केला जातो. जेव्हा जेव्हा कोणत्याही क्रिकेट सामन्यात पाऊस पडतो किंवा इतर कारणांमुळे सामना उशीर होतो, तेव्हा डकवर्थ-लुईस-स्टर्न नियम लागू केला जातो. मैदानी पंच वाया गेलेल्या वेळेनुसार हा नियम लागू करतो.

टॅग्स :ऑफ द फिल्डमृत्यूआयसीसी