मुंबई : ‘भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळादरम्यान वारंवार संघ बदल मला पसंत नव्हते. रणनीतीवर अंमल करण्यासाठी मी नेहमी कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत सहायकाच्या भूमिकेत राहिलो,’ असे राहुल द्रविड यांनी म्हटले आहे.
भारताने टी-२० विश्वचषक जिंकताच मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविड यांचा कार्यकाळ संपला. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओत द्रविड म्हणाले, ‘मी सातत्य बाळगणारा व्यक्ती आहे. मला संघात वारंवार बदल पसंत नाहीत. यामुळे अस्थिरता निर्माण होते. शांतता भंग होते, असे आपले मत आहे. व्यावसायिक, सुरक्षित, पोषक वातावरण असावे, अपयशाची भीती राहू नये आणि सर्वांना पुढे जाण्याची समान संधी मिळावी, अशा संघाची माझ्याकडे जबाबदारी होती. कोविडमधून खेळाडू बाहेर आले तेव्हाचा काळ कठीण होता. जवळपास सहा कर्णधारांसोबत काम करावे लागेल, असे ध्यानीमनी नव्हते. जबाबदारी स्वीकारली त्यावेळी कोविडच्या कठोर नियमातून हळूहळू बाहेर पडत होतो. तिन्ही प्रकारांत कार्यभार कसा असावा याचे व्यवस्थापन करायचे होते. काही खेळाडू जखमी असल्याने त्या ८-१० महिन्यांत ५-६ कर्णधारांसोबत काम करावे लागले. याची आधी कल्पना केली नव्हती, पण स्वाभाविकपणे त्यावर तोडगा काढला.’
द्रविड यांच्या मार्गदर्शनात भारताने इंग्लंडला पाच कसोटी सामन्यांत हरविले. संघ वनडे विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला. याविषयी ते म्हणाले, ‘कोविडनंतर सकारात्मक बाब ही घडली की आम्हाला पुरेसे सामने खेळायला मिळाले. गेल्या अडीच वर्षांत मर्यादित षटकांच्या सामन्यात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली. कसोटीतही काही युवा खेळाडूंना तपासून पाहण्यात आले.