सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. यादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील खेळाडू एकमेकांच्या गळाभेटी घेत आहेत. अशातच खेळाडूंनी आपली मैत्री मैदानाबाहेर ठेवायला हवी, असे भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने म्हटले आहे. यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, ही गौतम गंभीरची विचारसरणी आहे पण खेळाडूंमध्ये प्रेम असायला हवे, असे मला वाटते.
आशिया चषक २०२३ मधील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही देशातील खेळाडूंचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांना भेटत होते. पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतरही विराट कोहली आणि रोहित शर्मा पाकिस्तानी खेळाडूंशी बोलताना दिसले. यावर गंभीरने म्हटले की, मैत्री मैदानाबाहेर असली पाहिजे. सात तासांच्या क्रिकेट सामन्यानंतर तुम्ही मैत्रीपूर्ण होऊ शकता. कारण सामना सुरू असताना तुम्ही करोडो लोकांचे प्रतिनिधित्व करत असता.
शाहिद आफ्रिदीनं घेतली 'शाळा'गौतम गंभीरच्या या विधानाबद्दल शाहिद आफ्रिदीला प्रश्न विचारला असता त्याने सावधपणे उत्तर दिले. खेळाडूंनी प्रेमाचा संदेश द्यायला हवा असे आफ्रिदीने यावेळी सांगितले. "ही गौतम गंभीरची स्वतःची विचारसरणी आहे. माझा विचार यापेक्षा वेगळा आहे. क्रिकेटपटू असण्यासोबतच आम्ही राजदूत देखील आहोत हे विसरून चालणार नाही. आमचे जगभरात चाहते आहेत. म्हणूनच प्रेम आणि आदराचा संदेश देणे आवश्यक आहे. होय, मैदानात आक्रमकता आवश्यक असते पण मैदानाबाहेरही जग असते", असे आफ्रिदीने सांगितले.