इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला २६ मार्चपासून सुरूवात होणार आहे. आयपीएल भारतात परतल्याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे आणि लीगच्या स्वागतासाठी सारे सज्जही झाले आहेत. पण, पुन्हा एकदा परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश अशा मालिका जगाच्या विविध कोपऱ्यात सुरू आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाचे परदेशी खेळाडू आयपीएलसाठी उशीराने भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यात या पाच खेळाडूंचे सुरुवातीच्या सामन्यांना मुकणे हे फ्रँचायझीसाठी डोकेदुखी ठरणारे आहे.
डेव्हिड वॉर्नर ( David Warner ) - दिल्ली कॅपिटल्सने ६.२५ कोटी किंमत मोजून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला आपल्या ताफ्यात घेतले. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि त्यामुळे आयपीएल २०२२च्या पहिल्या आठवड्याला वॉर्नर मुकणार असल्याची शक्यता आहे. वॉर्नर फक्त कसोटी संघाचा सदस्य असल्यामुळे तो वन डे व ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नाही, परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या करारानुसार राष्ट्रीय मालिका संपेपर्यंत त्याला लीगमध्ये खेळता येणार नाही. त्यामुळे ५ एप्रिलपर्यंत वॉर्नर आयपीएलमध्ये खेळू शकत नाही.
एनरिच नॉर्खिया ( Anrich Nortje ) - दिल्ली कॅपिटल्सने रिटेन केलेल्या चार खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या या जलदगती गोलंदाजाचा समावेश आहे, परंतु त्याला दुखापतीमुळे आयपीएल खेळता येईल की नाही याबाबत संभ्रम आहे. नोव्हेंबर २०२१नंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्याच्या तंदुरुस्तीवर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेची वैद्यकिय टीम लक्ष ठेवून आहे.
जॉनी बेअरसोट ( Jonny Bairstow) - पंजाब कंग्सने ६.७५ कोटींत इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो याला करारबद्ध केले. पण, तो सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. त्याने पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करून इंग्लंडचा डाव सावरला. वेस्ट इंडिजविरुद्धची ही मालिका २९ मार्चला संपणार आहे आणि त्यामुळे तो आयपीएलच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
पॅट कमिन्स ( Pat Cummins) - कोलकाता नाइट रायडर्सने निम्म्या किमतीत म्हणजेत ७.२५ कोटींत ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स याला पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले. पण, ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि ५ एप्रिलपर्यंत कमिन्सलाही आयपीएलमध्ये खेळता येणार नाही.