- रोहित नाईक मुंबई : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने उपांत्य फेरी गाठली. यामध्ये सलामीवीर अंगक्रिश रघुवंशीचे योगदान मोलाचे ठरले. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्यांमध्ये सध्या अंगक्रिश तिसऱ्या स्थानी आहे. अंगक्रिशने ४ सामन्यांतून २७२ धावा काढताना एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. यामध्ये बोरिवली-गोराई येथील प्रशिक्षक दिनेश लाड यांची निर्णायक भूमिका ठरली आहे.
रोहित शर्मा व शार्दुल ठाकूर या स्टार क्रिकेटपटूंचे शालेय प्रशिक्षक असलेल्या लाड यांनी अंगक्रिशच्या खेळाला पैलू पाडले. मूळचा दिल्लीकर असलेल्या अंगक्रिशची गुणवत्ता पाहून मुंबईचा माजी क्रिकेटपटू अभिषेक नायरने अंगक्रिशचे वडील अवनीश आणि आई मलिका यांना विश्वास देत त्याला दिल्लीहून आपल्या घरी आणले. अभिषेकनेच त्याला पुढील प्रशिक्षणासाठी लाड यांच्याकडे पाठविले. २०१८-१९ च्या सत्रात गोराई येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये (एसव्हीआयएस) प्रवेश झाल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका अमृता वर्मा आणि विश्वस्त संदीप गोयंका यांनीही अंगक्रिशच्या क्रिकेट आणि अभ्यासातील ताळमेळ साधला. तत्कालीन संचालक योगेश पटेल यांनीही अंगक्रिशच्या अभ्यासासाठी मोठी मदत केल्याचे वडील अवनीश सांगतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्त्व करणारा अंगक्रिश एसव्हीआयएस आणि लाड यांचा सहावा शिष्य ठरला. त्याच्याआधी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड (भारत अ) व हरमित सिंग, सुवेद पारकर (दोघेही १९ वर्षांखालील संघ) यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
जेव्हा अंगक्रिश आमच्याकडे आला, तेव्हा त्याचे वजन अधिक होते. ते आधी कमी करायला लावले. त्याच्या बॅटिंग ग्रीपमध्येही बदल केले आणि त्याचाच जास्त फायदा झाला. मुंबईच्या १६ वर्षांखालील संघातही त्याची निवड झाली. अंगक्रिश पवईहून रोज ये-जा करत असल्याने त्याचा बराच वेळ प्रवासात जायचा. त्यामुळे त्याला शाळेकडून अभ्यासाच्या वर्गातून सूट मिळाली. मात्र, त्याचा अभ्यास थांबला नाही. अंगक्रिशने स्वत:वर जास्तीत जास्त विश्वास ठेवावा.- दिनेश लाड
अभिषेक नायर आणि दिनेश लाड सर यांचे अंगक्रिशच्या वाटचालीत मोठे योगदान आहे. लाड यांच्या प्रशिक्षणाचा खूप मोठा फायदा झाला. शिवाय शिक्षणासाठी एसव्हीआयएस शाळेने सर्व मदत केली. हा पाठिंबा आम्हाला मिळाला नसता, तर आमची मोठी अडचण झाली असती.- अवनीश रघुवंशी, अंगक्रिशचे वडील