Join us  

रेफ्युजी कॅम्प ते वर्ल्ड कपमधील पराक्रम! जगज्जेत्या इंग्लंडला हरवणाऱ्या 'टीम अफगाणिस्तान'चा थक्क करणारा प्रवास

इंग्लंडला हरवणं सोपं नव्हतंच, पण ते सहजसोपं करुन दाखवलं अफगाण टीमने. आजही त्या देशात तालिबानी राजवट आहे, तालिबानचा जगातल्या अनेक गोष्टींना विरोध असला तरी क्रिकेटला पाठिंबा आहे.

By meghana.dhoke | Published: October 16, 2023 2:24 PM

Open in App

-मेघना  ढोके 

अफगणिस्तान संघाने जगज्जेत्या इंग्लंड संघाला सहजी नमवलं. रविवारी दिल्लीत अफगाण संघ उतरला तेव्हा कुणाला वाटलंही नव्हतं की इंग्लंडच्या दमदार संघाची बॉलिंग फोडून काढत अफगाण बॅटर्स २८५चा टप्पा गाठतील. तो तर त्यांनी गाठलाच आणि मग आलं अफगाण स्पिनर्सचं वादळ. त्या फिरकीपुढे इंग्लंडचे दादा म्हणवणारे बॅटर्स गडबडले. इंग्लंडला हरवणं सोपं नव्हतंच, पण ते सहजसोपं करुन दाखवलं अफगाण टीमने. आजही त्या देशात तालिबानी राजवट आहे, तालिबानचा जगातल्या अनेक गोष्टींना विरोध असला तरी क्रिकेटला पाठिंबा आहे. अफगाण संघ भारतीय ब्रॅण्ड ‘अमूल’ने स्पॉन्सर केलेल्या पाठबळावर यंदाच्या विश्वचषकात उतरला आणि ब्रिटिश कोच जोनाथन ट्रोटच्या मार्गदर्शनाखाली एका चांगल्या टीमने आकार घेतला. सोबत मेण्टर म्हणून भारतीय अजय जडेजाही आहेच. पण सोपी नव्हती या संघाची वाटचाल... २०१९ मध्ये पहिल्यांदा अफगाण टीम वर्ल्ड कपपर्यंत पोहोचली होती, तेव्हा ‘लोकमत’ने अफगाण क्रिकेटचे जनक ताज मलीक यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंशी बातचीत केली होती...

क्या था? पीने को पानी नहीं था, रोटी नहीं था दो वक्त का, झुग्गी में जिंदगी बसर करते थे, गुर्बत ऐसी की ना जिये ना मरें..और आज वर्ल्डकपमें अफगणिस्तान का नॅशनल एंथम दुनिया सुनता है, तो हम अपने आप पें प्राउड करता है!.’-पठाणी भारदस्त आवाजात करीम सादिक हे सारं अफगाण वळणाच्या उर्दूत सांगतात. तेव्हा त्या पहाडी आवाजानं गिळलेला आवंढा फोनवरही जाणवतो. त्यांचं सगळं तारुण्य पाकिस्तानातल्या रेफ्युजी कॅम्पमध्ये गेलं. त्यामुळे उर्दू येतं त्यांना. आता ते अफगाणिस्तानात परत गेलेत. पाकिस्तान-अफगाणिस्तान बॉर्डरवर; पण पेशावरपासून तीन तासांच्या अंतरावर जलालाबाद नावाचं गाव आहे, तिथं सध्या करीम राहतात, नांगरहार नावाची क्रिकेट अकॅडमी चालवतात आणि आता रोज 300 मुलं त्यांच्या अकॅडमीत क्रिकेटचे धडे गिरवायला येतात. हे जलालाबाद आता अफगाणची क्रिकेट पंढरी बनतं आहे. अफगाण क्रिकेटला ज्यांनी सुरुवातीला जन्म दिला असे जे पहिले तीन-चार गिनेचुने लोक आहेत, त्यातलंच एक नाव म्हणजे करीम सादिक. अफगाणिस्तान-भारत सामन्यानंतर त्यांना फोन केला तर ते खूश होते, पटकन म्हणाले, ‘देखा ना, हार्दिक पांडय़ा का विकेट कैसा इझी निकाला आफताबने !’

सध्या अफगाणिस्तान क्रिकेट संघात खेळणारा आफताब आलम हा करीम सादिक यांचा धाकटा भाऊ. ही भावंडं एकेकाळी पेशावर जवळच्या काचा कारा रेफ्यूजी कॅम्पमध्ये राहत होतीं. 35 वर्षीय करीम सादिक स्वतर्‍ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले; पण ती कारकीर्द अल्पायुषी ठरली. मात्र आता क्रिकेटस्टार होण्याचं स्वप्न  जगणार्‍या अनेक अफगाण मुलांना ते क्रिकेट शिकवतात, त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘तेंदुलकर की बराबरी का’ क्रिकेटर जन्माला येईल असं स्वप्न  पाहतात आणि आपल्यालाही कधीतरी भारतात, आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली तर मजा येईल असं वारंवार बोलूनही दाखवतात.

पेशावरच्या रेफ्युजी कॅम्पमधले दिवस मात्र करीमना अजून आठवतात, ते सांगतात, ‘सहा-सात वर्षाचा असेन मी तेव्हा आम्ही पेशावरला आलो, अफगाणिस्तानात आमच्या डोक्यावर बॉम्ब फुटत होते, म्हणून जीव मुठीत घेऊन पाकिस्तानात आलो. तिथं आल्यावर कळलं की, आता आपण माणसं नाही, फक्त रेफ्यूजी आहोत. माणसांची तुंबळ गर्दी. तंबू बांधून राहायचो, खायला-प्यायला नव्हतं, अंघोळीला पाणी नव्हतं. टीव्ही म्हणजे काय, क्रिकेट म्हणजे काय हे माहिती असण्याचं काही कारणच नव्हतं. त्याच दरम्यान पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकला, सगळ्या पाकिस्तानात, गल्लोगल्ली क्रिकेट होतं. मुलं क्रिकेट खेळायची, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट टीव्हीवर आम्हीही मॅच पहायला जायचो, इंडिया-पाकिस्तान मॅच असेल तर सगळा माहौलच पागल व्हायचा. तिथं मलाही क्रिकेटचा किडा चावला. पोट भरायला आम्ही गालिचे विणायचं काम करायचोच; पण आगपेटीच्या कारखान्यातही कामाला जायचो. बहुतेक रेफ्यूजी मुलं काडय़ांना गुल लावायला, आगपेटय़ा भरायला खैबर मॅच फॅक्टरीतच कामाला जात. मी मात्र क्रिकेट खेळता यावं म्हणून रात्रपाळी घेतली, रात्री काम करायचो, दिवसा क्रिकेट खेळायचो. पण क्रिकेट खेळायचं तर कशानं? धोपटण्याची बॅट केली, चिंध्यांचा बॉल. प्लॅस्टिक किंवा टेनिस बॉलही आम्ही फार नंतर पाहिला.’

- करीम सादिक त्यांची एकटय़ाचीच नाही तर त्याकाळी पेशावरच्या रेफ्युजी कॅम्पमध्ये राहणार्‍या एका अफगाण पिढीची गोष्ट सांगत असतात. आणि तीच कहाणी अफगाण क्रिकेटचे जनक म्हणवले जाणारे ताज मलिकही सांगतात. तेही रेफ्यूची कॅम्पमध्ये राहायचे. ते आणि त्यांचे तीन भाऊ क्रिकेट खेळायचे, घरोघर जाऊन मुलांना क्रिकेट खेळायला बोलवायचे. रेफ्युजी कॅम्पमध्ये जाऊन चांगलं क्रिकेट खेळणारी मुलं हेरायचे. त्यांना क्रिकेट खेळायला घेऊन जायचे. त्याकाळी ताज मलिक यांनी स्वप्न पाहिलं ते अफगाणिस्तानचा राष्ट्रीय संघ बांधण्याचं. पण ते सोपं नव्हतं. रेफ्यूजी कॅम्पमधलं आयुष्य. पाण्याला रांगा, शिधा वाटला जायचा त्यासाठी रांगा, कपडय़ांसाठी रांगा आणि उरलेला वेळ झोपडय़ांत मुलं आणि बायका गालिचे विणायचं काम करत. त्या भयंकर वातावरणात सोबत होती ती फक्त अफूची. बायका-पुरुष-मुलं-अफूच्या तारेत काम करत. पाकिस्तानातल्या सगळ्याच रेफ्यूजी कॅम्पमध्ये हीच अवस्था होती कारण लाखो अफगाणी पाकिस्तानात दाखल झाले होते. पेशावरच्या खुरसान या खूूप मोठय़ा रेफ्युजी कॅम्पच्या जवळ असलेल्या खैबर मेडिकल कॉलेजच्या ग्राउण्डवरही अफगाण मुलं क्रिकेट खेळत. आज संघात असलेले बहुसंख्य अफगाण क्रिकेटपटू तिथंच क्रिकेट खेळलेत. मात्र बॅट, हेल्मेट, स्टम्प, क्रिकेटचा चेंडू हे सारं त्यांनी प्रत्यक्षात फार उशिरा पाहिलं.

तर अशाच गुणी मुलांना शोधत ताज मलिक या कॅम्पमधून त्या कॅम्पमध्ये फिरत. मात्र त्यांच्या वाटय़ाला अपमानापलीकडे काहीही येत नसे. ताज मलिक फोनवर त्या आठवणी सांगतात. त्यांना फोन केला तेव्हा ते पेशावर जवळच्या एका खेडय़ात होते. रेफ्युजी कॅम्पचा विषय निघाला तसे म्हणाले, ‘त्याकाळी आमच्याकडे 11 खेळाडूही नसत म्हणून आम्ही मुलांना बळजबरी बोलवायचो. क्रिकेट खेळणार्‍या अफगाणी मुलांचे वडील येऊन मला धमकवायचे. म्हणायचे, क्रिकेटमध्ये पोरांचा वेळ वाया जातो, नको त्यांना नको नादी लावूस!’ मी मात्र या मुलांना म्हणत असे, आपण काबूलला परत जाऊ, क्रिकेटचा संघ बांधू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू; पण कुणी ऐकत नव्हतं !’ 

दुसरीकडे पाकिस्तानी मुलं त्यांची टिंगल करत.  रेफ्युजी कॅम्पमधले अनेकजण कोंबडय़ा पाळत, त्यामुळे अफगाण मुलांच्या टीमला पाकिस्तानी मुलं ‘चिकन टीम’ म्हणून चिडवत.

(छायाचित्र  सौजन्य - द टाइम्स) 

1995 साल उजाडता उजाडता मलिक यांनी आपल्या अफगाण क्रिकेट क्लबचं अफगाण क्रिकेट फेडरेशनमध्ये रूपांतर केलं. देशाच्या ऑलिम्पिक कमिटीला आपली दखल घ्यायला लावली. आयसीसीनेही अफगाणिस्तानला अफिलिएट सदस्य म्हणून स्थान दिलं. दरम्यान तालिबानने फुटबॉलवर बंदी घातली. मात्र क्रिकेटला त्यांचा विरोध नव्हता. रेफ्युजी कॅम्पमध्ये वाढलेले आणि नंतर तालिबानच्या दलात गेलेले अनेकजणही क्रिकेट खेळत. पुढे तालिबाननेही क्रिकेट खेळायला परवानगी दिली, एवढंच नव्हे तर त्यांच्यातले काहीजण आवडीनं क्रिकेटची मॅच पाहायलाही येत.

करीम सादिक सांगतात, ‘आम्ही पेशावरमध्ये पाकिस्तानी स्थानिक संघासोबत मॅच खेळायचो, ते क्रिकेटच्या साहित्यासह खेळत आणि आम्ही हेल्मेट न घालता हातात बॅट घेऊन उभे. पुढं अनेक स्थानिकांनी, स्थानिक प्रशिक्षकांनीही आम्हाला मदत केली. खैबर मेडिकल ग्राउण्डच्या बाजूला आम्ही जमीन भाडय़ानं घेतली आणि तिथं सिमेंटची विकेट तयार केली, नेट लावलं आणि हार्डबॉलनं खेळणं सुरू केलं. दरम्यान, अफगाणिस्तानात हमीद करझाई सरकार आलं, तालिबान हद्दपार झाले. आम्ही करझाईंना भेटलो, त्यांना सांगितलं की, आम्ही अफगाण मुलं उत्तम क्रिकेट खेळतो, टॅलण्ट आहे, आम्हाला संघ बांधू द्या, मदत करा. त्यानंतर अफगाणच्या राष्ट्रीय खेळात क्रिकेट शामील झालं. चमन जवळ सिमेंटच्या तीन विकेट बांधल्या गेल्या. एशियन क्रिकेट कौन्सिलनं टीम बनवायला आणि पाकिस्तानने त्यांच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळायला आम्हाला परवानगी दिली. आणि डिव्हिजन एक, दोन, तीन, चार पार करत आम्ही थेट 2011च्या वर्ल्डकपर्पयत  पोहोचलो; पण वर्ल्डकपला क्वॉलिफाय करू शकलो नाही. मात्र तरीही आमची कमाई म्हणजे आम्ही पुढच्या चार वर्षासाठी ‘वन डे स्टेट्स’ कमावलं. आता आमची मुलं आयपीएलमध्ये खेळतात, टी 20 जिंकतात, पुढं जाण्याचा प्रवास सुरू आहे!’जे करीमना वाटतं तेच ताज मलिकही अभिमानानं म्हणतात की, ‘फक्त तालिबान, युद्ध, रेफ्युजी ही आता अफगाणिस्तानची ओळख नाही, क्रिकेट ही आमची नवीन ओळख बनते आहे.’

2015च्या विश्वचषकात काही अफगाणिस्तानला फार यश लाभलं नाही, यंदाही ते तळातच राहिले; पण तरीही भारतासारख्या संघाला जेरीस आणतील इतपत दर्जा त्यांनी कमावलेला जगानं पाहिलाच.

आता या वर्ल्डकपने काय बदललं अफगाणिस्तानात? एकीकडे तालिबान पुन्हा डोकं वर काढत आहेत, आणि लोक धास्तावले आहेत. पाकिस्तानने 2016 पासून अफगाण निर्वासितांना परत पाठवणं सुरू केलं आहे. साधारण तीन लाख 80 हजारहून अधिक निर्वासित पुन्हा अफगाणिस्तानात परतलेत. आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान अफगाणी निर्वासितांचा भार कमी करत लोकांना परत धाडण्याच्या मोहिमेवर आहे. आणि अफगाणिस्तानात लोंढे परतल्याने रोजीरोटीपासून जिवाच्या धास्तीचे आणि जगण्याचे प्रश्न हातपाय पसरत आहेत. त्यात अफगाण लोकांना उमेदीचा एक नवा चेहरा दिसतोय, त्याचं नाव क्रिकेट. अफगाणिस्तानात अनेक क्रिकेट अकॅडमी उभ्या राहिल्या आहेत. तरुण मुलं क्रिकेट खेळून ‘मोठं’ होण्याची स्वप्न  पाहत आहेत. काबूल, कंदाहार आणि जलालाबादला मोठी स्टेडिअम उभी राहत आहेत. टी-20 आणि आयपीएल, पाकिस्तान क्रिकेट लीग खेळण्याची स्वप्न  मूळ धरत आहेत. करीम सांगतात, ‘आता क्रिकेटवेडी झालीत इथली माणसं. मॅच असेल तेव्हा सगळं बंद असतं. मुलं-बायकाही मॅच पाहतात, कामकाज ठप्प होतं. इतना पॉप्युलर तो कभी नहीं था यहां क्रिकेट. आप देख लेना, एक दिन हमारा हुनर दुनिया मान लेगी!’.खरंय त्यांचं ! हुनर आणि जिगरचीच गोष्ट आहे ही, वर्ल्डकपचे सामने हरूनही बरंच काही जिंकलेली !

**********************************

नेबरहूड फर्स्ट आंतरराष्ट्रीय संबंधाच्या पोटात शिरण्याचा क्रिकेट मार्ग

अफगाण तरुणांनी निर्वासित जगण्यातून आपला क्रिकेटचा संघ उभा केला. केवळ पाकिस्तानातच नाही तर इराणसह युरोपात राहणारेही अफगाण लोक कधी नव्हे ती आपली ‘ओळख’ जगजाहीर करून अफगाणिस्तानची मॅच पाहायला आले हा बदल अफगाण माणसांसाठी मोठा आहे. कारण 9/11 नंतरच्या काळात ‘अफगाण’ ओळख घेऊन युरोपात जगणंही बहुसंख्यांसाठी गैरसोयीचं झालं होतं. मात्र या विश्वचषक स्पर्धेत अफगाण ओळखीला प्रतिष्ठा मिळण्याची निदान सुरुवात तर झाली.आणि हे सारं फक्तक्रिकेटच्या मैदानावरच झालं असं काही नाही तर अफगाणिस्तान - भारत, अफगाणिस्तान-पाकिस्तान आणि आयसीसीचं क्रीडा विस्तारवादी धोरण यासार्‍यातही घडलं. निर्वासितांचे लोंढे नको म्हणणार्‍या पाकिस्ताननंही अफगाण क्रिकेटला सुरुवातीच्या काळात बळ दिलं हे नाकारता येत नाही. मात्र त्यात आर्थिक मदतीपेक्षा आपल्या डोमेस्टिक स्पर्धात अफगाण संघाला खेळू देणंच अधिक होतं.

मात्र दरम्यान भारतात मोदी सरकारने ‘नेबरहूड फस्ट’ असं धोरण स्वीकारलं आणि अफगाणिस्तान आणि मालदिवमध्ये क्रिकेट स्टेडिअम बांधायला मोठी आर्थिक मदत केली. सध्या कंदाहारमध्ये बांधण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमसाठी भारत सरकारने दहा कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. अफगाण संघानं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणही भारतात बंगळुरूलाच करावं हा निव्वळ योगायोग नव्हताच. याशिवाय अफगाण खेळाडूंचं विशेष प्रशिक्षणही नोएडाच्या क्रीडा संकुलात आणि चेन्नई, डेहरादून इथं सुरू असतं. क्रिकेटच्या पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय दजाचं प्रशिक्षण हे भारत सरकार देऊ करतंय यात अफगाणिस्तानशी उत्तम संबंध आणि कूटनैतिक आघाडीवर पुढचं पाऊल आहे हे उघड आहे. त्यात आजच्या घडीला तरी आयसीसी बीसीसीआयच्या शब्दाबाहेर नाही, त्यामुळेही अफगाण संघाला उत्तम संधीही आयसीसी देऊ करत आहे.

हे चित्र असं असताना पाकिस्तान तरी मागे का राहील? आता पाकिस्तानही आर्थिक मदतीसह अफगाण खेळाडूंना प्रशिक्षण देत त्यांना पाकिस्तानच्या डोमेस्टिक स्तरावर सामावून घेण्याचा प्रयत्न  करत आहे.क्रिकेट डिप्लोमसीची एक वेगळी आघाडीही अफगाण क्रिकेटला पोषक ठरते आहे.

*********************************

अफगाण जर्सीवर अमूलचा लोगो?

या विश्वचषक स्पर्धेत खेळणार्‍या अफगाण संघाच्या जर्सीवर स्पॉन्सरर म्हणून ‘अमूल’चा लोगो अनेकांनी भारत-अफगाण सामन्याच्यावेळी पाहिला. तिकडे ‘अमूल’ कसं, असा प्रश्न समाजमाध्यमातही अनेकांनी मांडला. मात्र गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन अमूल ब्रॅण्डने दुग्धजन्य वस्तू निर्यात करते, त्यातही दरवर्षी सुमारे 200 कोटी रुपयांची निर्यात ते अफगाणिस्तानला करतात. याशिवाय भारतीय उपखंडात जर क्रिकेटचा 90 टक्के प्रेक्षक असेल तर एवढय़ा मोठय़ा संख्येर्पयत पोहचण्याचा प्रयत्नही या ब्रॅण्डने अफगाण संघाला स्पॉन्सर करून केला. बडय़ा संघांना मोजाव्या लागणार्‍या किमतीपेक्षा ही किंमत अर्थातच कमी असणार.

आणि सामन्यानंतर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील संदर्भानुसार अफगाण आणि अमूलचं आणखी एक नातं म्हणजे 1969 साली खान अब्दुल गफार खान यांनी अमूलला भेट दिल्याचे समजते.

(लेखिका लोकमत वृत्तपत्रसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)meghana.dhoke@lokmat.com 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपअफगाणिस्तानइंग्लंड