नवी दिल्ली : लवकरच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषक २०२२ (T20 World Cup 2022) चे बिगुल वाजणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आरोन फिंचने (Aaron Finch) नुकताच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेचा शेवटचा सामना त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीचा शेवटचा सामना ठरला आहे. या आपल्या शेवटच्या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी नवीन कर्णधाराला वेळ मिळायला हवी अशी फिंचची इच्छा आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या निवृत्तीनंतर २०१९ च्या विश्वचषकानंतर कर्णधार बदलणाऱ्या संघांच्या संख्येत वाढ झाली आहे.
दरम्यान, मागील विश्वचषकात एकूण १० संघांनी सहभाग घेतला होता आणि त्यामधील आतापर्यंत ९ संघांनी आपला कर्णधार बदलला आहे. आता फक्त एकच संघ असा राहिला आहे की त्याने अद्याप आपला कर्णधार बदलला नाही. न्यूझीलंडला पराभूत करून विश्वविजेता बनलेल्या इंग्लंडच्या संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गनने निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे इंग्लंडच्या संघाची धुरा जोस बटलरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर विराट कोहली नंतर रोहित शर्माला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. मागील विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसीस होता परंतु आता टेम्बा बवुमा संघाचे नेतृत्व करत आहे.
१० पैकी ९ संघांचे कर्णधार बदलले
बांगलादेशच्या संघाचा कर्णधार आता मुर्तजा नसून तमिम इक्बाल आहे. त्याचवेळी पाकिस्तानच्या संघाच्या कर्णधारपदाची धुरा सरफराज अहमदच्या जागी बाबर आझमच्या खांद्यावर आहे. वेस्ट इंडिजच्या संघाबद्दल भाष्य करायचे झाले तर जेसन होल्डरच्या जागी निकोलस पूरनकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर श्रीलंकेचे आता दिमुथ करुनारत्नेऐवजी दासुन शानाकाचे नेतृत्व करत आहे. लक्षणीय बाब म्हणजे केवळ न्यूझीलंड हा एकमेव संघ आहे ज्याने अद्याप आपला कर्णधार बदलला नाही. २०१९ च्या विश्वचषकात उपविजेत्या संघाचा कर्णधार केन विलियमसन होता. आताही विलियमसनच्याच खांद्यावर किवी संघाची जबाबदारी आहे. मात्र २०२३ च्या विश्वचषकापर्यंत संघाचा कर्णधार बदलण्याची अपेक्षा आहे.
संघ | २०१९ विश्वचषकातील कर्णधार | आता कर्णधार असणारे खेळाडू |
इंग्लंड | इयोन मॉर्गन | जोस बटलर |
ऑस्ट्रेलिया | आरोन फिंच | अद्याप घोषणा झाली नाही |
भारत | विराट कोहली | रोहित शर्मा |
श्रीलंका | दिमुथ करुणारत्ने | दासुन शनाका |
बांगलादेश | मशरफे मुर्तजा | तमीम इक्बाल |
अफगाणिस्तान | गुलबदीन नाइब | हशमतुल्लाह शाहिदी |
पाकिस्तान | सरफराज अहमद | बाबर आझम |
वेस्ट इंडीज | जेसन होल्डर | निकोलस पूरन |
दक्षिण आफ्रिका | फाफ डु प्लेसीस | टेम्बा बवूमा |
न्यूझीलंड | केन विलियमसन | केन विलियमसन |