बीसीसीआयच्या निवड समितीने न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी शुक्रवारी संघाची घोषणा करण्यात आली. त्यात मर्यादित षटकांच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी दोन वेगवेगळ्या कर्णधारांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित शर्माकडे वनडे संघाचं तर हार्दिक पांड्याकडे टी-२० संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. मात्र या संघात भारतीय क्रिकेटमधील एका दिग्गज फलंदाजाला स्थान मिळू शकलेलं नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपाठोपाठ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठीही सलामीवीर शिखर धवनला संघात स्थान देण्यात आलेले नाही. गेल्या काही काळापासून शिखर धवन हा खराब फॉर्ममध्ये होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याच्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. मात्र आता त्याला थेट संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
३७ वर्षीय शिखन धवनला यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. तसेच बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्याने तीन सामन्यांमध्ये ३,८ आणि ७ अशा मिळून एकूण १८ धावा बनवल्या होत्या. तर गेल्या ५ डावांमध्ये त्याला केवळ ४९ धावाच जमवता आल्या आहेत. शिखर धवनने २०११ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते.
शिखर धवन हा २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉपी स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातील प्रमुख खेळाडू होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघाने इंग्लंडला नमवून विजेतेपद पटकावले होते. त्या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत धवनने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला होता.
शिखर धवनने भारताकडून ३४ कसोटी सामन्यात २३१५, १६७ एकदिवसीय सामन्यात ६७९३ धावा जमवल्या होत्या. त्याशिवाय ६८ टी-२०मध्ये १७५९ धावा जमवल्या आहेत.