गेल्या दोन सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाला खडतर खेळपट्ट्यांना सामोरे जावे लागले. दिल्ली कॅपिटल्स संघाला, तर आम्ही पराभूत केले, पण शनिवारी रात्री मुंबई इंडियन्सविरुद्ध उप्पल स्टेडियममध्ये घरच्या मैदानात आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. कमी धावसंख्येच्या लढतींमध्ये स्ट्रोक्स खेळण्याची मुभा नसलेल्या खेळपट्टीवर सामना रंगतदार होतो. जर तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर प्रत्येक बाबीवर लक्ष देणे महत्त्वाचे असतो. विशेषता डेथ ओव्हर्समध्ये. कारण एक-दोन षटके महागडी ठरली तर निकालामध्ये मोठा फरक स्पष्ट करणारी ठरतात.
शनिवारी रात्री प्रतिकूल परिस्थितीमध्ये किएरॉन पोलार्डची खेळी विशेष महत्त्वाची ठरली. त्याच्या खेळीपासून आमच्या संघाला बरेच काही शिकावे लागेल. संथ खेळपट्टीवर तुमचा दृष्टिकोन लक्ष्य गाठणे, हा असतो. एक-दोन चांगल्या भागीदारीसह सांघिक कामगिरीही महत्त्वाची ठरते. कुठल्याही स्थितीत एक-दोन खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीच्या आधारावर तुम्ही जेतेपद पटकावू शकत नाही. दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियन्सविरुद्ध मधल्या फळीला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्याची संधी होती. शनिवारच्या लढतीत मधल्या फळीला चांगली कामगिरी करता आली नाही, असे मानले तरी आम्हाला आमच्या खेळाडूंच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी यापूर्वीही चमकदार कामगिरी केलेली असून त्यांना सूर गवसण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही, असे मला वाटते.
पहिल्या तीन सामन्यात डेव्हिड वॉर्नर व जॉनी बेयरस्टॉ यांनी बराचवेळ फलंदाजी केली आणि त्यांनी चमकदार कामगिरी केल्यामुळे मधल्या फळीला आपली छाप सोडण्याची संधी मिळाली नाही, पण सराव सत्रादरम्यान आम्ही फलंदाजांना कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असावे, याची तयारी केलेली आहे. कौशल्य व तयारीचा विचार करता त्यात कुठल्याही प्रकारची हयगय करता येत नाही. संघातील सर्व उणिवा झटपट दूर करण्यात येईल, याबाबत मला विश्वास आहे.
गेल्या लढतीत झेल घेण्याबाबत आम्ही अडचणीत होतो. क्षेत्ररक्षणावर अभिमान बाळगता येईल, असा आमचा संघ आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम क्षेत्ररक्षण असलेला संघ म्हणून आम्हाला नावलौकिक मिळवायचा आहे. शनिवारी आमची कामगिरी निश्चितच चांगली झाली नाही, पण आयपीएलमध्ये लवकरच बाजू पलटते आणि हीच या स्पर्धेची विशेषता आहे.
सोमवारी आम्ही किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळणार आहोत. खेळाडूंना मानसिकदृष्ट्या कणखर बनविण्याची जबाबदारी सपोर्ट स्टाफची आहे. पराभूत झालेल्या लढतींपासून आम्हाला बोध घ्यावा लागेल. खेळाडूंमध्ये नकारात्मकता यावी, असे आम्हाला वाटत नाही. चांगली सुरुवात महत्त्वाची असून निराश असेल तर काहीच लाभ होणार नाही.