नवी दिल्ली : चेन्नई सुपरकिंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२२ मधून एकही सामना न खेळता बाहेर पडला. चेन्नईने दीपकला १४ कोटींत संघात घेतले होते. मात्र, संघाबाहेर झाल्याने त्याला वेतनापोटी १४ कोटी मिळू शकतील का? याचे उत्तर आहे, होय!
काय आहे नियम -दीपकला १४ कोटी रुपयांची संपूर्ण रक्कम मिळेल. कारण तो बीसीसीआयच्या वार्षिक करार यादीत आहे. त्याला‘ क’श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. त्यापोटी बीसीसीआय दीपकला वार्षिक एक कोटी रुपये वेतन देते. बोर्डाने २०११ ला आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा विमा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यापोटी पाच हजार कोटींचा विमा काढण्यात येतो. यंदादेखील पाच हजार कोटींचा विमा काढला. भारतीय क्रीडाविश्वात विम्याची ही सर्वाधिक रक्कम मानली जाते. याअंतर्गत करारबद्ध खेळाडूंना जखमी अवस्थेत संपूर्ण रक्कम दिली जाते. ही रक्कम त्या खेळाडूची फ्रॅन्चायजी नव्हे, तर बीसीसीआय विम्याच्या रकमेतून देते हे विशेष. याअंतर्गत दीपकला लाभ मिळणार आहे.दीपक चाहरला १४ कोटी रुपये बीसीसीआयकडून मिळतील. सीएसकेवर हा भार पडणार नाही. आयपीएल सामने सुरू होण्याआधीच दीपक जखमी झाला होता. अशावेळी रक्कम देणे ही फ्रॅन्चायजीची जबाबदारी नाही. चाहर हा स्पर्धेदरम्यान जखमी झाला असता तर अर्धी रक्कम बोर्डाला आणि अर्धी रक्कम फ्रॅन्चायजीला देणे बंधनकारक होते. दीपकला दोहोंकडून प्रत्येकी ७-७ कोटी मिळाले असते.
या खेळाडूंना मिळाले पूर्ण वेतन मागच्यावर्षी श्रेयस अय्यर जखमी झाल्यामुळे आयपीएलचा पहिला टप्पा खेळू शकला नव्हता. त्यानंतरही त्याला पूर्ण वेतन देण्यात आले. आशिष नेहरा आणि शिखर धवन हे देखील जखमी झाल्याने बोर्डाने त्यांना विम्याच्या कवचातून पूर्ण रक्कम मोजली. दुसरीकडे करारबद्ध नसलेल्या खेळाडूंचा विचार केल्यास त्यांच्यासाठी असा कुठलाही नियम नाही. करारबद्ध नसलेला खेळाडू आयपीएल सामने सुरू होण्याआधी जखमी झाल्यास बोर्ड आणि फ्रॅन्चायजी त्याला कुठलीही रक्कम देत नाही.