मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्यावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. बुधवारी रात्री दीर्घ आजाराने जसलोक रुग्णालयामध्ये वाडेकर यांनी वयाच्या ७७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सकाळी १० वाजता वाडेकर यांचे पार्थिव वरळी सी फेस येथील त्यांचे निवासस्थान स्पोटर््सफील्ड अपार्टमेंट येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.परदेशात भारताला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारे माजी कर्णधार अजित वाडेकर यांना बुधवारी रात्री प्रकृती ढासळल्याने जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. भारत सरकारच्या वतीने वाडेकर यांना अर्जुन पुरस्कार (१९६७) आणि पद्मश्री पुरस्कार (१९७२) प्रदान करुन गौरविण्यात आले होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी रेखा, दोन मुले प्रसाद व विपुल आणि मुलगी कश्मिरा असा परिवार आहे. वाडेकर यांच्या निधनाने क्रिकेट विश्वातील मोठा तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. क्रिकेटसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होत असलेल्या वाडेकर यांचे भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान असून त्यांच्याच नेतृत्त्वामध्ये भारतीय संघाने परदेशात पहिला मालिका विजय नोंदवला होता. वाडेकर यांच्या नेतृत्त्वामध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी करताना १९७१ साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या संघांना त्यांच्याच भूमीत नमविले होते. १९६६ साली मुंबईत वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले वाडेकर एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे पहिले कर्णधारही होते.वाडेकर सरांच्या निधनाबद्दल दु:ख झाले. नव्वदच्या दशकात आमच्याकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करवून घेणारे ते सूत्रधार होते. त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शनाचे सदैव ऋणी राहू. - सचिन तेंडुलकरअजित वाडेकर यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. ते संघासाठी कोचपेक्षा मोठे होते. वडिलांसारखे प्रेम करणारी ही व्यक्ती ‘चतुरस्र रणनीतीकार’ होती. मला त्यांची उणीव जाणवेल. माझ्या क्षमतेवर सर्वाधिक विश्वास बाळगणारा मार्गदर्शक गमावला. तुमचे आभार सर. कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.- अनिल कुंबळेअजित वाडेकर यांच्या जाण्याने भारतीय क्रिकेटमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. खेळातील दीर्घ अनुभवाचा वापर त्यांनी प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि निवड समिती अध्यक्षपदावर असताना यशस्वीरीत्या केला. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली मिळविलेल्या यशामुळे भारतीय क्रिकेटमध्ये आत्मविश्वासाचा संचार झाला. त्याचबरोबर भारतीय क्रिकेटची प्रगतीही झाली.- अमिताभ चौधरी,सचिव- भारतीय क्रिकेटनियामक मंडळ (बीसीसीआय)महान व्यक्ती. त्यांच्या निधनामुळे दु:खी आहे. सर माझ्यासाठी पितृतुल्य होते.ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना.- मोहम्मद अझहरुद्दीनहा भारतीय क्रिकेटसाठी सर्वात दु:खद दिवस आहे. आम्ही एका यशस्वी कर्णधाराला आज मुकलो आहोत. आम्ही अजित वाडेकरांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.- रवी शास्त्री, प्रशिक्षक - भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेटवर वाडेकरांची छाप होती. समकालीन खेळाडूंसाठी ते पूज्यनीय होते. प्रशिक्षक म्हणून ते अत्यंत शिस्तप्रिय होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व इतरांना प्रेरणा देणारे होते. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.- संजय मांजरेकर, माजी क्रिकेटपटू
- Cricket Buzz»
- बातम्या»
- अजित वाडेकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार, मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
अजित वाडेकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार, मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्यावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 3:55 AM