Join us  

अजित वाडेकर यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार!

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 10:43 AM

Open in App

मुंबई - महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बुधवारी वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जसलोक रुग्णालयात वाडेकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वातील मोठा तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने परदेशात पहिली कसोटी मालिका जिंकून दिली. 1971 मध्ये वाडेकरांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या बलाढ्य संघांचा त्यांच्याच मायदेशात पराभव केला. 1958 पासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात करणाऱ्या वाडेकरांनी 1966 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 1966 ते 1974 या कालावधीत वाडेकर भारतीय संघाकडून खेळले.  

परदेशी जमिनीवर भारतीय संघाला जिंकायची सवय लावून देणारा कर्णधार अशी अजित वाडेकर यांची ओळख आहे. आक्रमक फलंदाज आणि स्लिपमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणूनही ते ओळखले जायचे.  भारत सरकारनं 1967 मध्ये अर्जुन पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता. तर 1972 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होते. 

 

टॅग्स :अजित वाडेकरक्रीडा