IND vs PAK updates in marathi | कोलंबो : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे स्थगित करण्यात आला असून राखीव दिवशी अर्थात सोमवारी खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सुपर ४ मधील सामना आजच्या दिवसापुरता स्थगित करावा लागला. रविवारी कोलंबो येथे पाऊस दमदार हजेरी लावेल असे संकेत दिले होते, परंतु दुपारी लख्ख प्रकाश होता अन् चाहते आनंदीत झाले होते. बाबर आझमने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीला बोलावले अन् रोहित शर्मा व शुबमन गिलने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. पण, त्यांच्या विकेट्स गेल्या अन् वरूण राजा रुसला... सातत्याने व्यत्यय आणत त्याने अखेर सामना राखीव दिवसावर ढकलला.
घातक समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजांची भारतीय सलामीवीरांनी धुलाई केल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर बाबर आझमने नाणेफेक जिंकून भारताला आयते कोलीत दिले. रोहित आणि शुबमन यांनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची विक्रमी भागीदारी केली. रोहित ५६ धावांवर, तर शुबमनही ५८ धावांवर बाद झाला. दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताचा डाव थोडासा मंदावला. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी संयमी खेळावर भर दिला. २४.१ षटकानंतर पावसाला सुरुवात झाली आणि मैदानावर कव्हर्स टाकण्यात आले. साडेपाच वाजता पाऊस थांबल्याने ५.५७ ला कव्हर्स काढण्याचं काम सुरू झालं, परंतु ६.०२ वाजता पुन्हा पाऊस सुरू झाला.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, शादाब खान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान, अलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हारीस रौफ.