भारत आणि अफगाणिस्तान यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना इंदूर येथे खेळवला जात आहे. पहिला सामना जिंकून विजयी सलामी देणाऱ्या भारतीय संघाकडे आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. तर, आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे मोठे आव्हान पाहुण्या अफगाणिस्तानसमोर आहे. पहिल्या सामन्यात शिवम दुबेच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर टीम इंडियाने सहज विजय मिळवला होता.
सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
खरं तर पहिल्या सामन्यात संघाबाहेर असलेला विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनी आजच्या सामन्यातून पुनरागमन केले आहे. त्यामुळे शुबमन गिल आणि तिलक वर्मा यांना बाकावर बसावे लागले. गिलला संघाबाहेर केल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. काही चाहत्यांनी तर रोहितला धावबाद केल्याचा परिणाम असल्याचे सांगत फिरकी घेतली.
दरम्यान, सलामीच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा धावबाद झाला होता. मिड ऑफच्या दिशेने फटका मारताच रोहितने धाव घेण्यासाठी कूच केली. मात्र, गिल चेंडूकडे पाहत राहिल्याने रोहितला आपली विकेट गमवावी लागली. याचा दाखला देत चाहते गिलची खिल्ली उडवत आहेत.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार. आजच्या सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ -इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, मुझीर उर रहमान, नवीन उल हक, फजलहक फारुकी.