नवी दिल्ली : बीसीसीआयचे (BCCI) सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) १८ ऑक्टोबरला बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे नवीन बोर्ड अध्यक्षाबाबत माजी मुख्य निवडकर्त्याचे नाव पुढे येत आहे. माहितीनुसार, माजी मुख्य निवडकर्ता बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांची जागा घेण्याची शक्यता आहे. खरं तर गांगुली १८ ऑक्टोबरला होणाऱ्या बीसीसीआयच्या निवडणुकीत भाग घेणार नाहीत. कारण ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतात. गांगुली आयसीसी अध्यक्ष म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. या वर्षाच्या अखेरीस आयसीसी अध्यक्षपदासाठीही निवडणूक होणार आहेत.
दरम्यान, सौरव गांगुलीच्या ऐवजी आता माजी भारतीय क्रिकेटर आणि मुख्य निवडकर्ता रॉजर बिन्नी बीसीसीआयचे पुढील अध्यक्ष होणार असल्याची चर्चा आहे. बिन्नी यांचे नाव फेव्हरेट्सच्या यादीत सर्वात वर असल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार, गुरुवारी बीसीसीआयच्या उच्च पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यात गांगुली यांना पुढील निवडणुकीत न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी सोशल मीडियावर खूप ट्रोल होऊ लागला आहे. रॉजर बिन्नी भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते बनले होते तेव्हा स्टुअर्ट बिन्नीला भारतीय संघात स्थान मिळाले होते.
आता चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे की, रॉजर बिन्नी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाले तर स्टुअर्ट बिन्नी भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करू शकतो. तसेच तो तिन्ही तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना पाहायला मिळू शकतो. स्टुअर्ट बिन्नी भारतासाठी ६ कसोटी, १४ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता.