ipl tweet | मुंबई : आयपीएलमधील कालचा सामना (MI vs PBKS) म्हणजे पंजाबचा प्रमुख गोलंदाज अर्शदीप सिंगसाठी एक वाईट स्वप्नच. कारण २०० पार आव्हान देऊनही पंजाबच्या संघाला आपल्या घरात विजय मिळवता आला नाही. खरं तर या हंगामात जेव्हा पंजाब आणि मुंबईचे संघ पहिल्यांदा भिडले तेव्हा पंजाबच्या सरदारांनी बाजी मारली होती. तेव्हा पंजाब पोलिसांनी सामन्यावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून 'गुन्हेगारांची नोंद घेण्याचे आवाहन मुंबई पोलिसांना (मिश्किलपणे) केले होते. पण कालच्या सामन्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
दरम्यान, वानखेडेवर झालेल्या सामन्यात अर्शदीप सिंगने मुंबईच्या फलंदाजांचा त्रिफळा उडवून सलग दोनवेळा स्टम्प तोडले होते. याचाच फोटो शेअर करत पंजाब पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले होते, "मुंबई पोलीस गुन्हेगारांची योग्य नोंद घ्यावी." लक्षणीय बाब म्हणजे काल पंजाबचा मुख्य गोलंदाज अर्शदीप सिंगने तर त्याच्या ३.५ षटकांत तब्बल ६६ धावा दिल्या. यावरून आता चाहते पंजाब पोलिसांची फिरकी घेत आहेत.
पंजाब पोलिसांची घेतली फिरकी
मुंबईच्या विजयानंतर नेटकऱ्यांनी पंजाब पोलिसांना त्यांच्या जुन्या ट्विटची आठवण करून दिली. अर्शदीप सिंगची काल झालेली धुलाई सांगत गुन्हेगारांना योग्य शिक्षा झाल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. "नमस्कार, पंजाब पोलीस... आम्ही योग्यरित्या गुन्हेगारांना शिक्षा केली आहे", अशा शब्दांत मुंबई पोलिसांच्या नावाने सुरू असलेल्या एक ट्विटर हॅंडलने प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईचा सलग दुसरा विजय
कालच्या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या संघाने सावध खेळी करून साजेशी सुरूवात केली. मुंबईचा संघ सामन्यात पकड बनवत असताना लियाम लिव्हिंगस्टोन पाहुण्या संघासाठी काळ ठरला. त्याने ४१ चेंडूत ७५ धावांची नाबाद स्फोटक खेळी केली. जितेश शर्माने देखील (४७) धावांची खेळी करून मुंबईसमोर २०० पार आव्हान ठेवले. पंजाबने निर्धारित २० षटकांत ३ बाद २१४ धावा करून मुंबईला २१५ धावांचे तगडे आव्हान दिले. तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला कर्णधार रोहित शर्माच्या (०) रूपात मोठा झटका बसला. पण इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी पंजाबची डोकेदुखी वाढवली. दोघांनी १०० हून अधिक धावांची भागीदारी नोंदवून विजयाकडे कूच केली. सूर्याने ३१ चेंडूत ६६ तर इशानने ४१ चेंडूत ७५ धावांची अप्रतिम खेळी केली. अखेरच्या षटकांत या जोडीला बाद करण्यात पंजाबला यश आले. पण टीम डेव्हिड नाबाद (१९) आणि तिलक वर्माने नाबाद (२६) धावा करून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: funny memes viral on hit back at punjab police after punjab kings arshdeep singh scored 66 in mi vs pbks match in ipl 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.